हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला उत्कृष्ट कलाकृती देणारा दिग्दर्शक हेमंत ढोमे हा ‘झिम्मा’नंतर आता ‘सनी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक वेगळी कथा देत आहे. आजपासून हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाविषयी सांगताना हेमंतने नेहमीच एक गोष्ट आवर्जून सांगितली आणि ती म्हणजे, ‘ हा सनी आपल्यातलाच एक आहे आणि गोष्ट आपल्यातल्याच त्या प्रत्येकाची आहे. या चित्रपटासाठी हेमंतची पत्नी क्षिती जोग निर्माती म्हणून काम पाहत आहेच शिवाय एका महत्वाच्या भूमिकेत देखील आहे.
क्षिती आणि हेमंत नेहमीच एकमेकांची साथ देत असतात. असे असताना आता हेमंतची क्षितीसोबतची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या दुसऱ्या बाळाचा उल्लेख केला आहे.
हेमंत ढोमेने हि पोस्ट त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘सनी…क्षिती आणि माझं दुसरं बाळ…आमच्या पहिल्या बाळाला म्हणजे झिम्मा ला तुम्ही बोर्डात आणलंत, भरभरून प्रेम दिलंत, त्याला डोक्यावर घेतलंत…सनी हे आमचं बाळ थोडं हट्टी आहे, द्वाड आहे, प्रचंड मस्तीखोर आहे पण खूप जास्त प्रेमळ आहे… आणि आम्हाला खात्री आहे, ते तुम्हा प्रेक्षकांचं बोट धरून मोठं होणार… त्याला सांभाळुन घ्या! उद्यापासुन आमचं कारटं तुमच्या भेटीला येतंय…तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असुदे…’
आजपासून संपूर्ण राज्यभरात हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. हा चित्रपट घरापासून दूर गेलेल्या त्या प्रत्येक माणसाच्या मनाजवळचा आहे. तसेच तरुणाईला भावणारा आहे. अलीकडेच या चित्रपटाचा प्रिरिलीज हाऊसफुल झाल्याचे दिसले. त्यामुळे आजपासून सनी चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळते हे पाहणे उत्सुकतेचे आहे. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासह क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर, हेमंत ढोमे देखील अन्य सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत.
Discussion about this post