हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांत मनोरंजन विश्वातून अनेक दुःखद वार्ता समोर आल्या आहेत. यातील काही दिग्गजांच्या निधनाने तर मनोरंजन विश्व पूर्ण हादरले आहे. अशातच आता पंजाबी सिने विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्री दलजित कौर यांचे निधन झाले असून संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक राकेश कुमार यांचे निधन झाले. हे दुःख सरण्याआधीच मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का लागला आहे. माहितीनुसार एका दीर्घ आजाराने दलजित यांचे निधन झाले आहे.
पंजाबी चित्रपट विश्वातील अत्यंत गाजलेले नाव अभिनेत्री दलजीत कौर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त समजताच मनोरंजन विश्वात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. अभिनेत्री दलजीत कौर या पंजाबी सिनेविश्वातील हेमा मालिनी म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांची हि विशेष ओळख इतर सिने इंडस्ट्रीवरही छाप पाडायची. दलजित यांनी पंजाबी प्रादेशिक भाषेतील अनेक लोकप्रिय चित्रपटांत काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातदेखील दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.
माहितीनुसार, दलजीत कौर यांनी १० पेक्षा जास्त हिंदी तर ७० पेक्षा जास्त पंजाबी चित्रपटात काम केले आहे. दलजीत यांनी पुणे फिल्म इंस्टीट्यूटमध्ये अभिनयाचे धडे घेतले आणि १९७६ साली त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मात्र पती हरमिंदर सिंह देओल यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पुन्हा चित्रपटात काम केलेच नाही. यानंतर त्या स्वतः आजारी पडल्या. पण २००१ साली त्यांनी पुन्हा सिनेसृष्टीत कमबॅक केलं. माहितीनुसार, दलजीत या उत्तम अभिनेत्री तसेच कबड्डी, हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू होत्या. मात्र गेल्या तीन वर्षांपासून त्यांची ब्रेन ट्यूमरशी लढत सुरु होती आणि अखेर या आजराशी त्यांची झुंज थांबली.
Discussion about this post