हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीची चावडी पहायला सगळेच उत्सुक असतात. कारण या दिवशी बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर स्पर्धकांची चांगलीच शाब्दिक धुलाई करतात. गेल्या आठवड्याची चावडी शनिवार रविवार एकदम खतरनाक रंगली. यावेळी बिग बॉसने २ स्पर्धक घराबाहेर होणार अशी आधीच स्पर्धकांना कल्पना दिली होती. दरम्यान रविवारी तब्बल ४९ दिवसांच्या प्रवासानंतर यशश्री मसुरकर घराबाहेर पडली. तिच्या एव्हिक्शनंतर मांजरेकर स्वतः घरात गेले आणि त्यांनी किरण माने याना घराबाहेर जायचे आहे हे सांगितले. पण खरा गेम तर इथूनच सुरु झाला. बिग बॉसने अशी कांडी फिरवली कि माने घराबाहेर गेले पण घरातून बाहेर नाही.
रविवारच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी कोणता सदस्य चांगला खेळला आणि कोणी टास्क उत्तम खेळले, याशिवाय कोण चुकलं आणि कोण चुकतंय यावर भाष्य करीत स्पर्धकांचा क्लास घेतला. यावरी अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने यांच्यात शाब्दिक बाचाबाचीदेखील बघायला मिळाली. दरम्यान किरण माने म्हणाले, ‘एक वाक्य खूप छान होतं अपूर्वाचं.. की अमृता बिग बॉसला खूप हलक्यात घेतेय’. यावर अपूर्वा म्हणते कि, ‘मी असं काहीही बोलले नाही. खोटारडा माणूस आहेस तू.’ यावर पुन्हा किरण माने म्हणाले कि, प्रोजेक्शनच्या नावाखाली आक्रस्थाळेपणा करू नको. हिडीस दिसतं ते.’ मग अपूर्वा म्हणाली, ‘हिडीस काय दिसते ते मी बघून घेईन तू कसा दिसतो ते बघ..’
यानंतर अखेर स्पर्धकांनी आपल्याला वाटणारे बॉटम ५ सदस्य निवडले आणि मग तो कठीण क्षण आला ‘डबल एव्हिक्शन’चा. ज्यामध्ये यशश्री नंतर घरामधून दुसरा सदस्य बाहेर पडणार होता. ज्यासाठी स्वतः महेश मांजरेकर घरात गेले. यावेळी मांजरेकरांनी किरण माने यांना घराबाहेर पडावे लागले, असे सांगितले. ज्याचा काहींना आनंद तर काहींना दुःख झाले. पण हाच तर गेम आहे. किरण माने फक्त स्पर्धकांसाठी घराबाहेर गेले आहेत. मुळात ते घरातच सिक्रेट रूममध्ये आहेत. जिथून ते संपूर्ण घरावर नजर ठेवणार आहेत. आपल्याविषयी कोण काय बोलतं? कोण कसं वागतं? हे सर्व काही ते जाणून घेणार आहेत आणि यानंतर जेव्हा ते पुन्हा घरात जातील तेव्हा सुरु होईल एक नवा खेळ.
Discussion about this post