हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडे मुंबईत ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय..?’ लिहिलेले मोठमोठे पोस्टर ठिकठिकाणी लावल्याचे दिसले. राजकीय सत्ताकारणावर कुणीतरी टीका करीत हे पोस्टर लावले असावे अशी अनेकांच्या मनात शंका आली. पण हे पोस्टर नक्की का लावले आणि कशाचे आहे..? याचा उलघडा आता झालाय. झी मराठी या मराठी वाहिनीवर येत्या २१ डिसेंबरपासून ‘लोकमान्य’ हि चरित्र गाथा सुरु होते आहे. या नव्या मालिकेचे प्रमोशन करण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आले होते. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून तो प्रचंड चर्चेत आहे.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय..? असा सवाल करत लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारला धारेवर धरले. जिथे स्वातंत्र्याचा कसूही नव्हता तिथे स्वतंत्र स्वराज्याचा सूर्य त्यांनी दाखवला. असे हे लोकमान्य आजही मनामनांत वसले आहेत. त्यांच्या कार्याची माहिती पुढील प्रत्येक पिढीला ठाऊक असणे हि आजच्या पिढीची जबाबदारी आहे आणि म्हणूनच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आयुष्यावर झी मराठी नवी मालिका घेऊन येते आहे.’ बदल घडत नाही तो घडवावा लागतो’ या प्रवाहाच्या दिशेने सध्या झी मराठीचा प्रवास सुरू आहे. म्हणूनच हा विचार ज्यांच्या जीवनाचा पाया होता त्या लोकमान्य टिळकांची जीवनगाथा लवकरच आपल्या समोर भव्य स्वरूपात येत आहे.
लोकमान्य टिळकांचे देशावरील प्रेम आणि स्वातंत्र्याविषयीही कळकळ हि त्यांनी घडवलेल्या इतिहासातून आपण जाणतोच. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा देशाभिमान शालेय जीवनापासून त्यांच्यात भिनलेला होता. लोकमान्य केवळ इतकाच उल्लेख केला तरीही बाळ गंगाधर टिळक यांचा तळपता प्रभावी इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्त्व हे राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर कसे होते..? आणि त्यांनी प्रचंड मनांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत कशी पेटवली हे आपण झी मराठीच्या माध्यमातून पाहणार आहोत. या मालिकेचे लेखन आशुतोष परांडकर यांचे असून स्वप्निल वारके यांनी दिग्दर्शक केले आहे. दशमी क्रिएशन्स निर्मित ‘लोकमान्य’ या मालिकेत अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Discussion about this post