हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे अनेकदा अनेक विषयांवर भाष्य करतात. त्यांच्या मतांवर टीका करणारे तसेच प्रेम करणारे असे दोन वेगवेगळ्या विचारांचे गट आहेत. कारण शरद पोंक्षे यांचे विचार हिंदुत्वाप्रती प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील निष्ठा दर्शवतं. ज्यामुळे अनेकदा ते परखड होऊन बोलतात. अनेकदा ते राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देतात. याहीवेळी त्यांचे व्याख्यान झाले आणि यातील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये ते न्यूटन आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्याबाबत अत्यंत लक्षवेधी तसेच महत्वपूर्ण विधान करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले आहेत, ‘आम्हाला न्यूटन मोठा वाटतो. न्यूटन मोठाच आहे. पण त्याने खाली काय येतं याचा शोध लावला. त्याच्या आधी १२व्या शतकामध्ये १६ वर्षांचं मुल सांगून गेलं खालून वर जाण्याची किमया.. त्यांचं नाव आहे ‘ज्ञानेश्वर’. ते फळ वरून खाली येतं पण ते वरपर्यंत जातं कसं..? जमिनीमध्ये बी पेरलं जातं. बी पेरल्यानंतर ते बी फुटतं. बी फुटल्यानंतर संपूर्ण कायनात, निसर्ग, पंचमहाभूतं त्याला वाढवण्याची जबाबदारी घेतात. खाली येण्याच्या विरुद्ध दिशेनं ते झाड वाढतं. जमिनीमधून बाहेर येतं. मग ते रोपटं वर वर जातं. कुठे गेला मग तो फळ खाली येण्याचा नियम..?’
शरद पोंक्षे पुढे म्हणाले कि, ‘रोपटं वर वर जातं… आकाशाकडे झेपावतं…. त्याचा मोठा वृक्ष तयार होतो… मग त्याला फुल, फळं लागतात. मग ते फळ पिकतं आणि खाली पडतं. त्यानंतर तो न्यूटन येतो. पण आधी आले ते ज्ञानेश्वर. हे सांगितल्यावर चेहऱ्यावर जे भाव येतात, त्याने उर भरून येतो, ज्ञानेश्वर वाचावे….असं वाटतं. त्यालाच म्हणतात अस्मिता.’ शरद पोंक्षे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिलंय कि, ‘आज माझ्या ज्ञानात एक चांगली भर आणि आणि शिकवण्याची जमापुंजी झाली’. असेच अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करताना पोंक्षे यांच्या स्पष्टीकरणाचे कौतुक केले आहे.
Discussion about this post