हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची शान आणि लोककलेचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून लावणी या नृत्य प्रकाराची विशेष ओळख आहे. हि लावणी जिवंत ठेवणाऱ्या अनेक कलाकारांपैकी एक प्रसिद्ध लावणी नृत्यांगना मीना देशमुख यांच्याबाबत अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. मीना देशमुख यांचे अपघाती निधन झाले आहे. या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे. नुकतेच अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्यानंतर मनोरंजन सृष्टी त्यातून सावरतेच तोवर या बातमीने पुन्हा एकदा दुःखाचा सागर लोटला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीना देशमुख यांच्या वाहनाला पंढरपूरजवळ अपघात झाला. हि गाडी तब्बल ५० फुट खोल कालव्यात पडली. या अपघातात मीना देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. तर गाडीत त्यांच्याव्यक्तिरिक्त असणारे आणखी तीन जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. यामध्ये त्यांची मुलगी, नात आणि चालक यांचा समावेश आहे. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
मीना देशमुख यांची फॉर्च्युनर कार हि मोडलिंबकडून पंढरपूरच्या दिशेने जाताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. तब्बल ५० फूट खोल कालव्यात पडल्यानंतर मीना देशमुख, त्यांची मुलगी, नात आणि चालक गंभीर जखमी झाले. दरम्यान स्थानिकांनी तातडीने बचाव कार्य सुरु केले. मात्र एव्हढ्यात मीना देशमुख यांनी प्राण सोडला होता. तर अन्य जखमींना तातडीने रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. एकीकडे पंढरपूर कुर्डूवाडी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असताना पाटबंधारे विभागाच्या दिरंगाईमुळे पुलाबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. यामुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. ज्या कालव्यात हि गाडी पडली त्या कालव्यात उतरायला जागादेखील नव्हती आणि त्यामुळे बचाव कार्यात अडथळे आल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
Discussion about this post