हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नुकताच पुण्यामध्ये क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठानच्या सभासदांसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी ‘गोष्ट एका पैठणीची’चा खास शो आयोजित केला होता. या शोसाठी चित्रपटातील अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, पुष्कर श्रोत्री यांची उपस्थिती होती. तसेच चित्रपट पहायला आलेल्या महिलांसाठी यावेळी चित्रपटाच्या टीमने लकी ड्रॉचे आयोजन केले होते. यामध्ये विजेत्या ठरल्या अलका मेमाणे. रुपाली ताईंच्या हस्ते त्यांना पैठणी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी चित्रपट पाहिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट पाहिल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या कि, ‘ ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला माझ्या मनापासून शुभेच्छा! आज मी स्वतः हा चित्रपट माझ्या क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठानच्या सभासदांसोबत पाहिला. कलाकारांनी अतिशय सुंदर असे सादरीकरण केलेलं आहे. पैठणीचा जरी विषय असला तरी त्यामध्ये आयुष्याच्या सारीपाटाचा विषय अतिशय सुंदररित्या मांडलेला आहे. खरंतर साडी आणि त्यामध्येही पैठणी महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रामाणिकपणा जोपासत धडपडणारी इंद्रायणी हे पात्र महाराष्ट्रातील महिलांचे प्रतिनिधित्व करणारे आहे. आम्हा महिलांना रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये २ क्षण आनंदाचे, विरंगुळ्याचे देत जीवनाचा साज आणि सार समजावून देण्याचा प्रयत्न ‘गोष्ट एका पैठणीची’ने केलेला आहे.’
मंत्रा व्हिजन प्रस्तुत, गोल्डन रेशो फिल्म्स, प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन निर्मित ‘गोष्ट एका पैठणीची’चे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
Discussion about this post