हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली आहे. मराठी रंगभूमी, नाटक आणि मालिका अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेता आणि दिग्दर्शक पराग बेडेकर यांचे काल १४ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाल्याचे समोर आले आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी संपूर्ण जगाचा निरोप घेतला असून यामुळे मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले आहे.
पराग बेडेकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगी आहे. शेवटरच्या श्वासापर्यंत पराग यांनी रंगभूमीची सेवा केली आहे. ‘यदा कदाचित’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, ‘सारे प्रवासी घडीचे’, ‘लाली लीला’ अशा अनेक नाटकांत पराग यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आणि गाजवल्या आहेत. ठाणे शहराला सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर करण्यात पराग यांचा मोलाचा वाटा आहे. पराग यांनी विविध नाटकांसह ‘कुंकू’, ‘आभाळमाया’, ‘चारचौघी’, ‘एक झुंझ वादळाशी’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्येसुद्धा विविध पात्रे साकारली होती.
पराग यांनी अभिनयासह दिग्दर्शन कला क्षेत्रातदेखील आपले नाव कमावले आहे. म्हणूनच त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. लेखक चंद्रशेखर गोखले यांनी पराग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘पराग गेला..? उत्कृष्ट अभिनेता, खूप सहज अभिनय करायचा, त्याच्या स्वत:च्या काही खास लकबी होत्या. बोलता बोलता नाक चोळण्याची त्याची खास स्टाईल होती. मी त्यावरुन छेडलं की छान हसायचा… हास्य तर लाजवाब होतं त्याचं… कुठे गेला कुठे गेला बा शोध अचानक थांबला’.
तसेच अभिनेता सागर खेडेकरने परागच्या निधनावर शोक व्यक्त करताना लिहिलंय कि, ‘अरे आपल्याला पुन्हा एकदा एकत्र नाटक करायचं होतं ना? मग? यदा कदाचित, लाली लीला या दोन नाटकांवरच मैत्री सोडून एवढ्या लांब गेलास? गेलास तो गेलास पुन्हा कधीच भेट होऊच शकत नाही या जन्मात एवढ्या लांब? असो बरं वाटत असेल तुला कदाचित… पण यार आम्हाला दु:खी करून गेलास…मिस करीन तुला यार.. जिथे कुठे असशील सुखी राहा मित्रा…पऱ्या तुझ्या आत्म्यास शांती मिळो’.
Discussion about this post