हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रंगदेवता आणि नाट्यरसिकांची अविरत सेवा करून शेवटचा निरोपही रंगभूमीच्या सानिध्यात घेणे हि कोणत्याही रंगकर्मींसाठी फार मोठी बाब आहे. अशीच एक घटना नाट्य रसिकांच्या काळजाला वेदना देणारी अमरावतीमध्ये घडली. रंगभूमीवर आयुष्य उधळून रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे अमरावती शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, ७८ वर्षीय रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचा काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांनी आयुष्यभर ज्या रंगभुमीची सेवा केली त्याच रंगभुमीसमोर ते निष्प्राण झाले. नाटक पाहतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमरावतीमधील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेतील ‘थँक यु मिस्टर ग्लाड’ हे नाटक सुरू राजाभाऊ मोरे प्रेक्षकगृहात बसून पाहत होते. यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याचे समजताच त्यांना तातडीने दवाखान्यात नेले. मात्र काळ आला होता आणि वेळही..
राज्य नाट्य स्पर्धा हा त्यांचा श्वास होता. दीर्घकाळ त्यांनी राज्य नाट्य स्पर्धा गाजविली. या निष्ठावान रंगकर्मीच्या निधनाने नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) December 16, 2022
एका ज्येष्ठ रंगकर्मीने नाटक पाहताना नाट्यगृहातच आपला प्राण सोडल्याचे समोर येताच संपूर्ण जिल्हा हळहळ व्यक्त करू लागला. आज शुक्रवारी, सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अमरावतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राजाभाऊ यांच्या निधनावर सांस्कृतिक आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्वीट करत लिहिलंय कि, ‘अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी श्री. राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मीचा आधारवड हरपल्याचे दुःख आहे. रंगदेवतेचा वास असलेल्या नाट्यगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून दीर्घकाळ हौशी व प्रायोगिक रंगभूमीची सेवा केली. राज्य नाट्य स्पर्धा हा त्यांचा श्वास होता. दीर्घकाळ त्यांनी राज्य नाट्य स्पर्धा गाजविली. या निष्ठावान रंगकर्मीच्या निधनाने नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे’.
Discussion about this post