हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसल्याचे समोर आले होते. यामुळे आपल्याच घरात आपल्यालाच जागा नाही अशी काहीशी अवस्था मराठी चित्रपटांची झाली आहे. अलीकडेच मराठी सिनेमा ‘सनी’ला स्क्रीन्स कमी मिळाल्यामुळे हा चित्रपट लवकर थिएटर बाहेर पडला. यांनतर आता हॉलिवूडच्या ‘अवतार’ चित्रपटाच्या रिलीजमुळे मराठी भयपट ‘व्हिक्टोरिया’ची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. हा चित्रपट आज १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट नवीन वर्षात रिलीज होणार असल्याचे समोर आले आहे.
आशय कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांचा बहुचर्चित मराठी भयपट ‘व्हिक्टोरिया’ आज दिनांक १६ डिसेंबर २०२२, शुक्रवार रोजी रिलीज होणार होता. पण आता या चित्रपटाचे प्रदर्शन तब्बल महिनाभर पुढे ढकलण्यात आले आहे. हा चित्रपट आता नव्या वर्षात १३ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
सोनालीने याबाबत माहिती देताना लिहिले आहे कि, ‘व्हिक्टोरिया हा मोठ्या स्क्रीनच्या अनुभवासाठी बनलेला चित्रपट आहे . बॉक्स ऑफिसवर जास्तीत जास्त शोज सह आणि इतर कोणत्याही संघर्षां शिवाय प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आमचे ध्येय आहे आणि याच दृष्टिकोनातून आम्ही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत आहोत. व्हिक्टोरियाचे रहस्य आता १३ जानेवारी २०२३ ला उलगडणार… रसिक प्रेक्षक हो असेच प्रेम असू द्या! #व्हिक्टोरिया १३ जानेवारी पासून सिनेमागृहात…’
सूत्रांनुसार, हॉलीवूडच्या ‘अवतार’ या चित्रपटामुळे मराठी भयपट ‘व्हिक्टोरिया’ला थिएटरमध्ये आवश्यक तितक्या स्क्रीन दिल्या गेल्या नाहीत. यामुळे चांगल्या कलाकृतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे असे होऊ नये आणि लोक एक उत्तम कलाकृती पाहण्याला मुकू नयेत म्हणून व्हिक्टोरियाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन थेट महिनाभर पुढे ढकललं आहे. अद्याप निर्मात्यांनी अधिकृतपणे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचं कारण सांगितलेलं नाही.
मात्र सोनालीने लिहिल्याप्रमाणे कोणत्याही संघर्षाशिवाय..हे इतकेच शब्द विचार करायला भाग पाडत आहेत. अभिनेता विराजस कुलकर्णीने ‘व्हिक्टोरिया’चे दिग्दर्शन केले आहे. तर आनंद पंडित, रूपा पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी निर्मिती केली आहे. आशा आहे कि येत्या वर्षात मराठी चित्रपटांची गळचेपी थांबेल आणि त्यांना हक्काच्या स्क्रीन्स मिळतील.
Discussion about this post