हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कॉमिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामनांत अभिनेता कुशल बद्रिकेने स्वतःच असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारा कुशल अनेकदा अनेक पोस्ट शेअर करतो. जितका उत्तम अभिनेता तितकाच उत्तम तो शब्दांत व्यक्त होत असतो. अलीकडेच त्याने एका कवितेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाविषयी त्याने आपल्या भावना शब्दांत व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमातील काही फोटो शेअर करत त्याने कॅप्शन मध्ये कवितांचा कार्यक्रम आणि मैफिल यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे.
कुशल बद्रिकेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘कवितांचा कार्यक्रम आणि मैफिलीत फरक तो काय..? तर कवितांच्या कार्यक्रमात कवी आपली पुस्तक उघडतो आणि स्वतःच्या एकाहून एक अशा अफलातून रचना ऐकवतो, ज्या कवितेंमध्ये पृथ्वीला गवसणी घालण्याची आणि आभाळाला भेदून टाकण्याची ताकद असते. हे असलं “वादळ” ते शब्दांमधून हळूहळू आपल्यात उतरवत असतात. मैफलित असं काही होत नाही इथे “कवी” कवी राहत नाही वा ” प्रेक्षक” प्रेक्षक राहत नाहीत, “प्रेक्षागृहातला अंधाराचा हात स्टेजवरचा प्रकाश कधी धरतो” कळत नाही आणि सगळेच मग रसिक होऊन जातात, आणि व्यक्त होत राहतात.
व्यक्त होणारा पुस्तकांऐवजी स्वतःचं काळीज उघडून समोर ठेवतो, मग त्याचा एकएक- एकएक कप्पा उलघडून अलगद, आपल्या हरएक जखमेवर फुंकर घालत राहतो. अशा मैफलीतून घरी जाताना आपण काहीच घेऊन जात नाही उलट स्वतःला थोडसं विसरूनच येतो मैफलीत. अशाच एका मैफलीला जाऊन आलो परवा “संदीप वैभव आणि कविता” एकदा नक्की या ह्या मैफलीला… “पाण्यात पोहण्यात मौज असतेच, पण डुंबून जाण्यातही मौज आहे”! हे सांगणारे क्षण कमीच येतात आयुष्यात”.
Discussion about this post