हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक गेल्या वर्षपासून आपल्या चाहत्यांच्या भेटीला विविध माध्यमातून आला. प्रत्येक माध्यमातून त्याने प्रेक्षकांची दाद मिळवली. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ आणि प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर’ हे दोन्ही चित्रपट २०२२ या वर्षातले हिट चित्रपट ठरले. यांनतर त्याने ‘माझा आनंद’ या पुस्तकाच्या माध्यमातून एक लेखक म्हणूनही नवी ओळख निर्माण केली. यांनतर आता नवे वर्ष, नवे स्वप्न म्हणत प्रसादने २०२३ मधील पहिली मोठी घोषणा केली आहे.
अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. सोबतच त्याने या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील शेअर केले आहे. हा आगामी चित्रपट प्रभाकर पणशीकर यांच्या जीवनावर आधारित बायोपिक चित्रपट असणार आहे. ज्याचे नाव आहे ‘तोच मी.. प्रभाकर पणशीकर..’. या बायोपिक चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘नवं वर्ष… नवं स्वप्न…सोबत जुनेच मित्र कलावंत… आणि… आशीर्वाद देणारे आहेत “पंत”..’
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या जीवनावर आधारलेला ‘तोच मी.. प्रभाकर पणशीकर’ हा चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत देशपांडे तयार करीत आहेत. आजपर्यंत अभिजित यांनी अनेक दर्जेदार चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. गेल्या वर्षातील त्यांचा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट तुफान गाजला होता. शिवाय डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित ‘आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर’ हा बायोपिक देखील अभिजीत यांनीच साकारला होता. ज्याला प्रेक्षकांनी तुफान प्रेम दिले. यानंतर आता प्रभाकर पणशीकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे प्रेक्षकही आतुर झाले आहेत. या भूमिकेत प्रसाद ओक दिसणार आहे हि बाब आणखीच उत्सुकता वाढवणारी आहे.
Discussion about this post