हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनय, सूत्रसंचालन, नृत्य, काव्य लेखन अशा विविध माध्यमातून प्राजक्ता माळीने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. पण आता प्राजक्ताने तिच्या आयुष्यातील एक नवीन इनिंग सुरु केली. ज्याचे नाव आहे ‘प्राजक्तराज’. हे काय आहे..? तर हा एक पारंपरिक मराठी साज आहे जो घेऊन प्राजक्ता आपल्या समोर आली आहे. अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या या नवीन शृंखलेच्या वेबसाईटचे महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि कला- इतिहासप्रेमी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाकादंबरीकार, इतिहास प्रेमी व अभ्यासक विश्वास पाटील उपस्थित होते.
प्राजक्ताने महाराष्ट्राच्या विविध भागातील आभूषणे ‘प्राजक्तराज’च्या माध्यमातून जगभरातील आभूषणप्रेमींसाठी आणली आहेत. यावेळी प्राजक्ताला तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, ‘प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ हा स्वतःचा जो ब्रँड उभा केला आहे, त्यासाठी तीचे अभिनंदन. तीने जे दागिने दाखवले त्यांची माहिती मलाही नव्हती. तिची या संकल्पनेमागची भावना, हेतू खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याला आपल्याच काही गोष्टींचा इतिहास माहीत नसतो. प्राजक्ताप्रमाणेच पुढील पिढीही आपला पारंपरिक, मौल्यवान ठेवा, दागिने त्यांच्या पुढील पिढीला सांगण्यासाठी जोपासतील.‘
प्राजक्ताचे कौतुक करताना महाकादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले, ’कोणतीही कृती करण्यासाठीचे मूळ हे रक्तातच असावे लागते. प्राजक्ता ही महाराष्ट्रातील मुलगी आहे. त्यामुळे मराठी परंपरा जपण्याचे मूळ हे तिच्या रक्तातच आहे. तिने उचललेले हे पाऊल स्तुत्य आहे. तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ‘प्राजक्तराज’ पोहोचावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे.’ प्राजक्ताच्या या नव्या इनिंगचे तिच्या चाहत्यांनीदेखील सहर्ष स्वागत केले आहे. तसेच सोशल मीडियावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा तिच्यावर वर्षाव होत आहे.
Discussion about this post