हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचे यंदाचे चौथे पर्व प्रचंड गाजले. तब्बल ३ महिन्यांच्या तपाचे फळ रविवारी महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांना मिळाले. या खेळात पहिल्या दिवसापासून अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अमृता धोंगडे, अक्षय केळकर यांनी पूर्ण ताकद लावली होती. यानंतर अर्ध्यातून राखी सावंत या घरात आली आणि अख्ख घर राखीमय झालं. हे ५ सदस्य यंदाच्या पर्वाचे टॉप ५ ठरले. यांपैकी अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने याच दोघांपैकी एक विजेता ठरणार असे प्रेक्षकांचे मत होते. पण ऐनवेळी अख्खा गेम पलटला आणि अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला. या विजयाचा आनंद त्याच्या चाहत्यांना नक्कीच आहे पण अनेक प्रेक्षकांसाठी हा मोठा धक्काच ठरला.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरेल असे कुणालाच वाटले नव्हते. पण आपल्या शक्ती आणि युक्तीच्या बळावर अक्षयने हा विजय मिळवलेच. या घरात आल्यापासून अक्षयने खेळासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे सगळ्यांनीच पाहिले. अत्यंत हुशारीने तो खेळताना दिसला. जे रुचत नाही ते पटत नाही असा थेट स्वभाव असणारा अक्षय अनेकदा भिडतानाही दिसला. तर कित्येकदा आपल्या जादुई स्वभावाने दोस्त बनवताना दिसला. त्याची खेळायची पद्धत इतकी वेगळी होती कि त्याला सगळे मास्टर माइंड म्हणू लागले होते. बिग बॉसनेही त्याचे ‘शिकारी’ आणि ‘जादूगर’ अशा शब्दात कौतुक केले होते.
बिग बॉसच्या खेळामध्ये सर्वात चतुर खेळाडू म्हणून अक्षय केळकरची ओळख होती. अत्यंत शिताफीने तो प्रत्येक युक्ती लढवत होता आणि याच कुवतीवर त्याने अख्खा डाव पलटला म्हणायचं. या घरात एंट्री केल्यापासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण बरोबर दाखवलं. कित्येक वाद झाले, राडे केले पण तो स्वतःची बाजू मांडताना कधी डगमगला नाही. अनेकदा प्रेक्षकांनी त्याला चिडका, आगाऊ म्हटले पण शेवटी अक्षयचा खेळ पाहून प्रेक्षकांचीही मन त्याने जिंकलीच आणि बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली.
Discussion about this post