हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचे यंदा चौथे पर्व होते आणि हे पर्व तुफान गाजले. कालच्या रविवारी दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी या पर्वाचा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सिजनचा विजेता कोण होणार..? याबाबत सर्व प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली होती. दादरची अपूर्वा नेमळेकर आणि सातारचा बच्चन अर्थात किरण माने या दोघांमध्येच चुरशीची लढत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे होते. पण ऐनवेळी गेम पलटला आणि या पर्वाचा मास्टरमाइंड अक्षय केळकर जिंकला. या विजयाने त्याचे चाहते प्रचंड खुश असले तरीही अनेक प्रेक्षक नाराज झाले आहेत. पण शेवटी खेळंच तो म्हणत अपूर्वाने अक्षयचे भरभरून कौतुक केले आहे आणि चाहत्यांचेही आभार मानले आहेत.
बिग बॉस मराठीच्या खेळात रनरअप ठरलेल्या अपूर्वाने एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे कि, ‘प्रवास संपला तरीही तुमचं प्रेम काही कमी झालं नाही. अपूर्वा आर्मी आणि माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार ! हा प्रवास तुमच्या शिवाय अपूर्ण आहे’.
आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत तिने म्हटले आहे कि, ‘बिग बॉस चा प्रवास खडतर होता पण खूप काही शिकवून जाणारा देखील होता खेळात किंवा भांडणात नेहमीच चर्चेत राहून प्रेक्षकांची मन मी जिंकली आणि घरातला खेळ देखील जिंकत आले आहे म्हणून तुमचं हे प्रेम असच कायम राहू द्या आणि माझ्या पुढील प्रवासासाठी अश्याच शुभेच्छा मला देत रहा’.
अपूर्वा खेळात जरी हरली असली तरीही प्रेक्षकांच्या मनात तिने स्वतःची जागा निर्माण केली आहे. त्यामुळे प्रेक्षक सोशल मीडियावर अपूर्वाच्या खेळाचे भरभरून कौतुक करत आहेत. इतकेच काय तर अनेक नेटकरी अपूर्वाच्या या पोस्टवर कमेंट करताना म्हणत आहेत कि, ‘कुणीही जिंकलं असलं तरीही आमच्यासाठी तूच या खेळाची विजेती आहेस’.
सोशल मीडियावर अपूर्वाला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळाल्यावर कदाचित खेळात हार झाल्याचे दुःख किंचितभर कमी झाले असेल. ‘शंभर दिवसाचा हा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने अविस्मरणीय आणि अद्भुत झाला या साठी सगळ्यांचे मनापासून आभार ! Thank you Bigg Boss’ असे म्हणत अपूर्वा वारंवार बिग बॉस शो मेकर्स आणि चाहत्यांचे आभार मानत आहे.
Discussion about this post