हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हि एक उत्तम अभिनेत्री असून तिने साऊथ सिने इंडस्ट्री तर गाजवली आहेच. शिवाय ओटीटी पदार्पण करून तिने हिंदी भाषिक वेब सीरिजमध्येही अव्वल भूमिका साकारली. समंथाचे विविध भाषिक चाहते आहेत आणि तिचं फॅनफॉलोईंग प्रचंड मोठं आहे. अलीकडेच तिचा ‘यशोदा’ हा चित्रपट प्रचंड गाजला आणि त्यानंतर आता लगेच ती नव्या रूपात भव्य पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिच्या ‘शाकुन्तलम’ चित्रपटाची चर्चा होती. त्याच चित्रपटाचा आता हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे.
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा ‘शाकुन्तलम’ हा तेलगू चित्रपट असून तो संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. नुकताच या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला आहे. जो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. साधारण २ मिनिट ५२ सेकंदाचा हा ट्रेलर आहे. ज्यामध्ये एकही क्षण तुमची नजर इथून तिथे होणार नाही. या ट्रेलरची सुरुवात चिमुकल्या शकुंतलाच्या जन्मापासून होते. जिला लहानपणीचं तिच्या पालकांनी सोडून दिले होते. शकुंतलाचा जन्म ऋषी विश्वामित्र आणि स्वर्गातील अप्सरा मेनका यांच्या प्रेमसंबंधातून झाला आहे. शकुंतलाला तिच्याच माता पित्यानी सोडून अनाथ केल्याचे समजताच ऋषी कण्व तिची पूर्ण काळजी घेतात.
शकुंतला मोठी होते आणि जंगलात राजा दुष्यंतची नजर तिच्यावर पडते. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात आणि ते जंगलातच लग्न करतात. राजा दुष्यंत शकुंतलाला परत येण्याचे वचन देऊन निघून जातो, पण तिच्या पदरी तिच्या आईने भोगलेले भोग येतात. पुढे हि कथा आणखीच रंजक होत जाते. ती पाहण्यासाठी चित्रपट रिलीज होण्याची वाट पहावी लागेल. या चित्रपटात अल्लू अर्जुनची ६ वर्षीय लेक अल्लू आरहा देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. ‘शाकुन्तलम’च्या रिलीजबद्दल बोलायचं तर, हा चित्रपट आधी नोव्हेंबर २०२२ मध्ये रिलीज होणार होता. पण VFX आणि हिंदी रिलीजमुळे तारीख पुढे ढकलली. नव्या अपडेटनुसार, हा चित्रपट येत्या १७ फेब्रुवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेत हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे आणि या चित्रपटात समंथासोबत देव मोहन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Discussion about this post