हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सिने जगतासाठी ऑस्कर एखाद्या स्वप्नासारखा आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी मोठी लढत असते. अलीकडेच द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांच्याकडून ऑस्कर पुरस्कारासाठी जगभरातील विविध भाषिक चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ‘द काश्मीर फाइल्स’, ‘कांतारा’, ‘आर.आर.आर’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट’ या चित्रपटांसह मराठी सिनेसृष्टीचा ‘मी वसंतराव’ देखील ऑस्करच्या शर्यतीत दाखल झाला आहे. या गोष्टीचा आनंद व्यक्त करत दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
सुप्रसिद्ध मराठी गायक राहुल देशपांडे अभिनित ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केले आहे. या चित्रपटाने ऑस्करसाठी झेप घेतल्यानंतर निपुण धर्माधिकारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘अभिमानास्पद क्षण..! रसिकांचं अलोट प्रेम मिळालेला आमचा मी वसंतराव चित्रपट ९५ व्या प्रतिष्ठित, ऑस्कर्स पुरस्कारासाठी पात्र ठरला आहे..! सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन.’
‘मी वसंतराव’ हा एक बायोपिक चित्रपट असून वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी त्यांचे आजोबा वसंतराव देशपांडे यांची भूमिका अतिशय अव्वल साकारली आहे. या चित्रपटात राहुल यांच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर, अनिता दाते, कुमुदिनी वालोकर आणि अमेय वाघ हे कलाकारदेखील अन्य महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
Discussion about this post