हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| आपल्या आजुबाजुला असा एकतरी मित्र असतो, ज्याचे प्रेमात बांबू लागलेले असतात. प्रेमातील हाच अनुभव सांगणाऱ्या ‘बांबू’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ‘बांबू’ चित्रपटाची संपूर्ण टीम या सोहळ्याला उपस्थित होती.
ट्रेलरमध्ये अभिनय बेर्डे आपल्याला एका साध्या मुलाच्या भूमिकेत दिसतोय. जो प्रेमभंगाच्या काळात प्रत्येक मुलीला रडायला खांदा देतोय. प्रत्येक मुलगी त्याला ‘त्या’ नजरेनं कधी बघतंच नाहीए. खऱ्या प्रेमाच्या शोधात असतानाच त्याच्या आयुष्यात ‘त्या’ नजरेनं बघणारी मुलगी येते. मात्र या प्रेमात मित्र पार्थ भालेराव प्रेमाच्या आड येताना दिसतोय. आता अभिनयला त्याचं खरं प्रेम मिळणार का, की प्रेमात बांबू लागणार, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. ट्रेलरमध्ये तेजस्विनी पंडितचीही झलक दिसत आहे. आता तिची यात काय भूमिका आहे, हे २६ जानेवारीलाच कळेल. अभिनय बेर्डे, पार्थ भालेराव आणि वैष्णवी कल्याणकर यांच्यासोबतच आपल्याला शिवाजी साटम, समीर चौघुले, अतुल काळे आणि स्नेहल शिदमही दिसत आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, ” या चित्रपटाच्या कथेचा अनुभव मी कॅालेजमध्ये स्वतःही घेतला आहे. त्यामुळे हा चित्रपट मला खूप जवळचा वाटला. प्रत्येकाला हा चित्रपट आपल्या आयुष्याशी जवळचा वाटणारा आहे. त्यामुळेच हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचे मी ठरवले.’’
निर्माती तेजस्विनी पंडित म्हणते, ” मी खरं तर दोन्ही अनुभवलं आहे. माझे बांबूही लागले आहेत आणि मीही बांबू लावले आहेत. मला असं वाटतं दहा पैकी नऊ जणांना ‘मी तुला त्या नजरेनं पाहिलं नाही’ या गाण्याचा किंवा प्रेमात ‘बांबू’ लागल्याचा आयुष्यात अनुभव येतो. त्यामुळे हा विषय अनेकांना जवळचा वाटेल. यात तरूणाईही आहे आणि शिवाजी साटम, अतुल काळे, समीर चौघुले यांसारखे दिग्गजही आहेत.
हा चित्रपट युथ ओरिएंटेड दिसत असला तरी यात कौटुंबिक मनोरंजनही पाहायला मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही ‘बांबू’ बघू शकता. कदाचित असं होईल, तुमचे बाबा, आई, दादा हा चित्रपट पाहून आल्यावर त्यांच्या कॅालेजच्या अशा आठवणी तुमच्यासोबत शेअर करतील.”
निर्माते संतोष खेर म्हणतात, “प्रत्येक वयोगटाला आवडेल, असा हा चित्रपट आहे. जेव्हा मी ‘बांबू’ची कथा ऐकली, तेव्हाच ठरवलं हा चित्रपट करायचा. यात मजा आहे. मनोरंजन आहे. विषय आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला आहे. याशिवाय यातून एक संदेशही देण्यात आला आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीनं ‘बांबू’ची मांडणी करण्यात आली आहे.’’
क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. ‘बांबू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून लेखन अंबर हडप यांनी केले आहे.
Discussion about this post