हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांचे वडील आणि ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते, नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईत वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंबर कोठारे यांच्या निधन वार्तेची पुष्टी त्यांची नातसून अर्थात आदिनाथ कोठारेची पत्नी उर्मिला कोठारेने केली. अंबर कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी जेनमा, पुत्र महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांच्या निधनवार्तेने संपूर्ण सिनेविश्वाला मोठा धक्का लागला आहे.
अंबर कोठारे यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आणि अभिनेता आदिनाथ कोठारेने व त्याची पत्नी आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. आदिनाथ आणि उर्मिलाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर अंबर कोठारे यांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या फोटोवर लिहिले आहे कि, ‘स्व. श्री. अंबर कोठारे (१४.०४.१९२६ – २१.०१.२०२३) ||अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनं| देहान्त तव सनिध्यम्, देहि मे परमेश्वरम्|| बाबा आम्हाला तुमची नेहमीच आठवण येईल – कोठारे कुटुंबीय’. फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना’.
आदिनाथच्या या पोस्टवर सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी अंबर कोठारे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अंबर कोठारे यांनी विविध नाटकं तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती आणि आजही स्मरणात राहिलेली आहे. अंबर कोठारे यांनी उत्तम नाटकांची निर्मितीही केली होती. केवळ नाटकंच नव्हे तर उत्तम चित्रपटांचीही त्यांनी निर्मिती केली होती. शिवाय महेश कोठारे यांच्यातीळ अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या कला गुणांना त्यांनी वाव दिला. तसेच योग्य जडणघडणीत त्यांना तयार केले. इतकेच काय तर महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही महत्त्वाच्या कलाकृतींमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिकादेखील साकारल्या होत्या.
Discussion about this post