हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रसिक प्रेक्षकांना जागतिक दर्जाच्या चित्रपटांची मेजवानी देणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदाच्या वर्षी २ ते ९ फेब्रुवारी २०२३ या काळात संपन्न होत आहे. या चित्रपट महोत्सवाचं हे २१ वं वर्ष आहे. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या G20 बैठकीमुळे हा चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षं साजरा करणारा हा महोत्सव असल्याचं संयोजक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता थिएटर अकादमी, सकल ललित कलाघर, मुकुंदनगर येथे महोत्सवाचा उदघाटन समारंभ संपन्न होईल.
या चित्रपट महोत्सवाची सुरुवात इराणी चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास यांच्या होली स्पायडर या चित्रपटाने होणार आहे. डेन्मार्क, स्वीडन, जर्मनी या युरोपीय देशांत या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. तर मिशेल हजानाविसीयस दिगदर्शित कुपे (फायनल कट) हा फ्रेंच चित्रपट हा समारोपाचा चित्रपट असेल.
या चित्रपट महोत्सवात ८० देशांतील १२० हून अधिक चित्रपटांचा समावेश असणार आहे. यात मदार, ग्लोबल आडगाव, गिरकी, टेरेटरी, डायरी ऑफ विनायक पंडीत, धर्मवीर आणि पंचक या ७ मराठी चित्रपटांचा समावेश आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर चित्रपटगृहात ६ पडद्यांवर तर बंडगार्डन येथील आयनॉक्स चित्रपटगृहात ३ पडद्यांवर हे चित्रपट रसिक प्रेक्षकांना पाहता येतील.
या महोत्सवात चित्रपटांसोबतच अनोख्या कार्यशाळांचं आयोजनही करण्यात आलं आहे. याचं वेळापत्रक खालीलप्रमाणे:-
३ फेब्रुवारी – दी इन्व्हिजिबल आर्ट ऑफ फिल्म एडिटिंग – ए श्रीकर प्रसाद (५०० हून अधिक चित्रपटांचे एडिटर)
४ फेब्रुवारी – लेसन्स आय हॅव लर्णट सो फार – विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान – चैतन्य ताम्हाणे
५ फेब्रुवारी – थिंकिंग इमेजेस
– सिनेमॅटोग्राफर शाजी करून
६ फेब्रुवारी – मेन स्ट्रीम सिनेमा टुडे – राहुल रवेल
७ फेब्रुवारी – ह्युमर इन सिनेमा – जॉनी लिव्हर
८ फेब्रुवारी – मेकिंग फिल्म्स अँड वॉचिंग फिल्म्स – जेंडर इन हिंदी सिनेमा – अरुणा राजे, डॉ लक्ष्मी लिंगम
८ फेब्रुवारी – चॅलेंजेस ऑफ फिमेल ऍक्टर्स इन दि एंटरटेन्मेंट वर्ल्ड – विद्या बालन
या कार्यशाळा/व्याख्यानं सेनापती बापट रोडवरील पीव्हीआर थिएटरमध्ये दुपारी 3.30 ते 5 या वेळेत पार पडतील. चित्रपट महोत्सवासाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या व्यक्तींनाच या कार्यशाळेत सहभागी होता येईल. कोरोना संकटावर मात करत जगभरातील दिग्दर्शकांनी मागील २ वर्षांत बनवलेल्या या चित्रपटांचा आस्वाद सिनेरसिकांनी घ्यावा असं आवाहन जब्बार पटेल यांनी केलं. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नाव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना ६०० तर इतर नागरिकांना ८०० रुपये फी असणार आहे.
Discussion about this post