हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलु व्यक्तिमत्व केदार शिंदे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वारंवार चर्चेत राहिले आहेत. याचे कारण म्हणजे या वर्षात येऊ घातलेले त्यांचे दोन चित्रपट. एक म्हणजे ‘बाईपण देगा देवा’ आणि दुसरा ‘महाराष्ट्र शाहीर’. यातील महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. अशातच अलीकडेच महाराष्ट्र शासनाने ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या गाण्याला अधिकृत राज्यगीत म्हणून घोषित केले. प्रसिद्ध कवी राजा बढे लिहीत, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि कृष्णराव ऊर्फ शाहीर साबळे यांनी तडफदार आवाजात गायलेले हे गाणे आज महाराष्ट्राचं अधिकृत राज्यगीत म्हणून सन्मानित झाले आहे. याबाबत आनंद व्यक्त करताना केदार शिंदेंचाही उर भरून आला आणि त्यांनी आपल्या भावना पोस्ट शेअर करीत व्यक्त केल्या आहेत.
केदार शिंदे यांनी आजोबांसोबतचा फोटो शेअर करत अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. यात कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय कि, ‘My real Hero. #महाराष्ट्रशाहीर साबळे. बाबा, तुमच्या जन्मशताब्दी वर्षात पुन्हा एकदा तुमचा झंझावात निर्माण होतोय. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत आता राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं. तुमच्या मनात खरच ही इच्छा असणार. १९६० पासून अव्याहतपणे तुम्ही हे गौरव गीत जगभर गाऊन प्रसिद्ध केलत. तुम्ही आता नसताना पुढच्या कितीतरी पिढ्या आता याच गाण्याला मानसन्मान देतील’.
पुढे लिहिलं आहे कि, ‘या वर्षात तुमच्या जीवनावर आधारित सिनेमा सुध्दा येईल. आत्मा जागृत असतो. आणि तो जे आपल्याला हवं ते करून घेतो. तुम्ही करताय. आम्ही केवळ निमित्तमात्र. २८ एप्रिल रोजी जेव्हा तमाम जनता सिनेमा पाहील आणि तुमच्या कार्याला मानाचा मुजरा करेल, तेव्हाच मी जन्माला येण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल’. केदार शिंदे यांची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तसेच केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागली आहे.
Discussion about this post