हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक हृषिकेश जोशी लवकरच ‘येतोय तो खातोय’ या नव्याकोऱ्या नाटकाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर राजकीय स्थितीचा खरपूस समाचार घेण्यास सज्ज झाले आहेत. सध्याच्या राजकीय नाट्यावर काय आणि किती बोलणार..? म्हणूनच आता मराठी नाट्य रंगभूमीवर राजकीय परिस्थितीच्या गाभात जाऊन सादरीकरण करण्यात येणार आहे. येत्या १० फेब्रुवारी २०२३ रोजी या नाटकाचा शुभारंभ प्रयोग होणार आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना एक भन्नाट, कल्लोळ करणारी नाटिका पहायला मिळणार आहे.
‘येतोय तो खातोय’ या नाटकाचे लेखन विजय कुवळेकर यांनी केले आहे. तर नाटकाचे दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. नाटकाच्या कास्टबद्दल बोलायचं झालं तर यात अभिनेता संतोष पवार, स्वप्नील राजशेखर, अधोक्षज कऱ्हाडे, सलीम मुल्ला, ऋषिकेश वाबुंरकर, हृषिकेश जोशी, भार्गवी चिरमुले आणि मयुरा रानडे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या नव्या नाटकातून हे कलाकार काय सांगू पाहतात हे जाणून घ्यायचे असेल तर नाट्यगृहात जाणे गरजेचे आहे.
‘येतोय तो खातोय’ या नाटकात राजकीय विसंगतीवर भाष्य करणारी एकूण ६ दमदार गाणी आहेत. राजकारणातल्या डावपेचांचा उपरोधिक समाचार घेणारे हे नाटक विनोदी पद्धतीने आणि तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न सदारकर्त्यांनी केला आहे. हृषिकेश जोशी ‘येतोय तो खातोय’ या नाटकाबद्दल बोलताना म्हणाले कि, ‘सध्याचं राजकारण आकलनापलीकडेच आहे. ‘येतोय तो खातोय’ या नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनासह ‘राजकीय पोलखोल’ केली जाणार आहे. ही पोलखोल करताना कोणाचीही राजकीय बाजू घेण्याचा व कोणाचाही राजकीय विरोध करण्याचा प्रयत्न या नाटकात नसणार आहे’.
Discussion about this post