हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला नेहमीच काहीतरी भन्नाट देतात. असाच एका जबरदस्त चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे सज्ज झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पोलीस आणि डाकू यांच्यातील चकमक यात दिसत होती. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असतानाच आता या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर झळकले आहे.
‘घर बंदूक बिरयानी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ७ एप्रिल २०२३ रोजी ‘घर बंदुक बिरयानी’ हा चित्रपट सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ मराठी अभिनेते सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी यापूर्वीदेखील अनेक कलाकृती प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. आतापर्यंत यांनी एकत्र येऊन फॅन्ड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट चित्रपट मराठी सिने सृष्टीला दिले आहेत. यानंतर आता ‘घर बंदुक बिरयानी’ हा एक वेगळ्या धाटणीचा अनोखा चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन येत आहेत.
Discussion about this post