हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ संपून बरेच महिने उलटून गेले आहेत. मात्र या मालिकेतील ओम आणि स्वीटूची जोडी त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. यानंतर मालिका संपूनही कलाकारांच्या आयुष्यात काय सुरु आहे याबाबत प्रेक्षकांनी नेहमीच उत्सुकता दर्शवली आहे. या मालिकेत ओमची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचला. आता त्याला त्याची खऱ्या आयुष्यातली स्वीटू भेटली आहे आणि त्याचा नुकताच साखरपुडा झाला आहे.
अभिनेता शाल्व किंजवडेकर लवकरच त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकरशी लग्न करणार असून गेल्या काही दिवसांपासून त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरले आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये श्रेयाच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसली. इतकेच नव्हे तर तिच्याबरोबर या फोटोंमध्ये शाल्वदेखील दिसला.
सोशल मीडियावर त्यांचं लग्न होणार असल्याची चर्चा रंगली. लग्नाआधीचे विधी सुरु असल्याचे बोलले जात होते. मात्र या दोघांचं लग्न नाही तर हि तयारी साखरपुड्याची होती. रविवारी यांचा साखरपुडा पार पडला असून याचे फोटो शाल्वने शेअर केले आहेत.
साखरपुड्यावेळी शाल्वने व्हाईट रंगाचा शर्ट आणि ब्ल्यू रंगाचा ब्लेझर घातला होता. तर श्रेयाने फ्लोरल डिझाईन असलेला व्हाईट रंगाचा घागरा परिधान केला होता. दोघेही अतिशय सुंदर आणि आनंदी दिसत होते. शाल्व आणि श्रेयाच्या साखरपुड्याला त्यांचे कुटुंबीय आणि मित्र मंडळी उपस्थित होते. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माहितीनुसार, श्रेया आणि शाल्व दोघेही पुण्याचे आहेत आणि गेली अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत आहेत.
Discussion about this post