हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून मराठी सिने विश्वात आपल्या इतिहासाची सुवर्ण पाने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उलगडली आहेत. भव्य रुपेरी पडद्यावर आपला इतिहास मोठ्या अभिमानाने त्यांनी जिवंत उभा केला. ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याचं कारण एकच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मनामनात असलेला आदर आणि भक्ती. यानंतर आता आगामी इतिहासात उल्लेख केला जाईल अशी एक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक मोठी बाब समोर आली आहे.
इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला असून याबाबत शिवरायांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इस्राईलचे वाणिज्य दूतावास यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची भेट घेतली. याबाबत पोस्ट शेअर करताना दिग्पाल लांजेकर यांनी हि माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलंय, ‘ईस्राईल… छळाकडून बळाकडे गेलेल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार उत्सुकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे.
‘विविध क्षेत्रांतील कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या लोकांशी चर्चा करून इस्राईलचे Consulate हे शिवरायांच्या बाबतीत माहिती गोळा करत आहेत. Consulate ऑफिस मधून आलेल्या निमंत्रणानुसार Consul general Mr. Kobbi Shoshani यांची भेट झाली. त्यावेळी त्यांच्याशी शिवरायांच्या रोमहर्षक प्रशासकीय गुणांची आणि त्यासंदर्भातील प्रसंगांची चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलेले मुद्दे ऐकल्यानंतर श्री.kobbi यांनी शिवरायांची प्रशंसा केली. त्यांना कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा अनुवादित ग्रंथाची इंग्रजी प्रत आणि महाराजांच्या जिरेटोपाचे स्मृतिचिन्ह श्री. दिग्पाल लांजेकर यांनी भेट दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्रिखंडात असेच गाजत राहो आणि या शिवयज्ञात सातत्याने आमच्याकडून समिधा अर्पण होत राहोत ही शिवचरणी प्रार्थना’. लांजेकरांची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
Discussion about this post