हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका, चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि मराठी सिनेविश्वातील चॉकलेट हिरो वैभव तत्ववादी पहिल्यांदाच एकत्र एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘सर्किट’ असे आहे आणि या चित्रपटाची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात हृता आणि वैभव या आधी दिसले नाहीत अशा अंदाजात दिसून येणार आहेत. ‘सर्किट’चा टिझर रिलीज होताच या नव्या जोडीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर ‘सर्किट’ या चित्रपटाचा टिझर चांगलाच व्हायरल होत आहे. या चित्रपटात अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता वैभव तत्त्ववादी यांचा हटके अंदाज सगळ्यांनाच थक्क करणार आहे. सर्किटच्या टिझरला अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून त्यांना हि नवी जोडी आणि त्यांची केमिस्ट्री आवडते आहे. ‘फॅशन’, ‘पेज ३’ , ‘बबली बाउन्सर’, ‘इंडिया लॉकडाऊन’ अशा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर हे या मराठी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांचा नातू आकाश पेंढारकर करत आहे. आकाश पेंढारकर हे गेली अनेक वर्षे मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘कच्चा लिंबू’, ‘होम स्वीट होम’, ‘मस्का’, ‘भेटली तू पुन्हा’ आणि ‘पावनखिंड’ सारख्या अनेक चित्रपटांची प्रस्तुती त्यांनी केली आहे. तर ‘चोरीचा मामला’ या चित्रपटाची निर्मिती आकाश पेंढारकर यांनी केली आहे. ‘सर्किट’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहेत.
चित्रपटाची पटकथा आणि संवाद संजय जामखंडी यांचे आहेत. तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. हा चित्रपट येत्या ७ एप्रिल २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रोमान्स आणि अॅक्शन दोन्हीचा तडका आहे. त्यामुळे फ्रेश जोडी आणि फुल्ल एंटरटेनमेंटसह हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतोय.
Discussion about this post