हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने विश्वातील सगळेच कलाकार नेहमी चर्चेत असतात. पण सोशल मीडिया आणि पँपराझी यांचं राखी सावंतसोबत असलेलं नातं काही औरच आहे. तीच नुसतं नाव जरी काढलं तरी काही ना काही ड्रामा होणार अशी कुणकुण लागते. सोशल मीडियावर राखी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, चक्रम चाळ्यांमुळे, अतरंगी बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वीच राखीच्या आईचे निधन झाले, त्यानंतर पती आदिलसोबत घटस्फोट. तिच्या आयुष्यात एका मागे एक वाईट घटना घडत असताना आता एक चांगली बातमी समोर आली आहे. ती अशी कि, राखीच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट येणार आहे. ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन तिचा भाऊ राकेश करणार आहे.
राखीच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी पाहून तिचं आयुष्य स्वतःच एक सिनेमा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण तरीही राखी सर्व गोष्टींवर मात करून नेहमीच सक्षम आणि भक्कमपणे उभी राहिली आहे. तिचा हा अंदाज नेहमीच तिच्या चाहत्यांना भावतो आणि म्हणूनच तिच्या भावाने राकेशने थेट चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘रावडी राखी’ असे असेल अशीही माहिती राकेश यांनी दिली आहे. या चित्रपटात राखी एका रावडी महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राकेशने राखीवर चित्रपट काढणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी राकेश म्हणाले, ”रावडी राखी’ हा सिनेमा मी करत असल्याचे वृत्त अगदी खरे आहे. राखी खरोखरच तिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात रावडी आहे. तिला त्रास देणाऱ्या लोकांना ती तिच्या पद्धतीने सरळ करते. तिच्या आयुष्यात अडथळे निर्माण करणाऱ्या कोणालाही राखी सोडत नाही. त्यामुळेच मी तिच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार आहे. राखीने तिचा पती आदिल यालासुद्धा चांगलाच धडा शिकवला आहे. परंतु, फक्त यामुळेच मी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतलेला नाही. राखीने आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे’.
‘रावडी राखी’ या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार असून या सिनेमात राखी मुख्य भूमिकेत असेल आणि तिच्यासोबत तगडी स्टारकास्ट असणार आहे. आतापर्यंत असरानी, मनोज जोशी, सयाजी शिंदे आणि अनु कपूर हे कलाकार या सिनेमाचा भाग असतील असे सांगितले गेले आहे. मात्र सगळ्यात मोठी बाब अशी कि, एव्हढं असूनही अद्याप राखीने स्वतः कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच राखी जर पोलिसाच्या भूमिकेत असेल तर राखीच्या भूमिकेत कोण असेल हा प्रश्न अजून तरी अनुत्तरित असेल.
Discussion about this post