हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनी आघाडीच्या वाहिन्यांपैकी एक आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आता या वाहिनीवर लवकरच एक अशी मालिका येतेय जिच्या पहिल्या टीझरनेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘रक्षणकर्ता वेतोबा’ असं या मालिकेचं नाव असून हि मालिका दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान श्री देव वेतोबाच्या लीलांवर आधारलेली आहे. ‘रक्षणकर्ता वेतोबा’ या मालिकेचा खास प्रोमो होळी आणि रंगपंचमीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये आपल्याला वेतोबाच्या पादुका आणि केळीचा घड दिसत आहे.
कोकणातल्या प्रथा आणि परंपरा यांवर अनेक मालिका आल्या आहेत. हि मालिका देखील कोकणातील देवावर आणि आख्यायिकांवर आधारित असणार आहे. वेतोबा हे कोकणातील आरवली गावातील ग्रामदैवत आहे. श्री देव वेतोबा मंदिर हे सिंधुदुर्गातील वेंगुर्लेपासून १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आरवली गावचे ग्रामदैवत आहे. श्री देव वेतोबा हे दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान आहे. श्री देव वेतोबा उभ्या दक्षिण कोकणचा पालक, रक्षक आणि संकट निवारक असून अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. संकटात भक्ताच्या हाकेला धावून जाणारा आणि संकटातून तारणारा श्री देव वेतोबा हा नवसाला पावणारा देव म्हणूनही ओळखला जातो. वेंगुर्ले- शिरोडा- रेडी रस्त्यावर आरवली येथे श्री देव वेतोबाचे पुरातन देवस्थान आहे. अगदी रस्त्यावरुनच श्री देव वेतोबाचे दिव्य दर्शन घडते.
श्री देव वेतोबाची मूर्ती हि भव्य मानवाकृती आहे. श्री देव वेतोबाच्या चेहऱ्यावरील झुपकेदार मिशा पाहून देव साक्षात समोर उभे असल्याचे भासते. वेतोबा देवाचे मंदिर हे अत्यंत प्रशस्त आणि दुमजली आहे. सुमारे २ हजार लोक येथे सामावतील इतकी या मंदिराची भव्यता आहे. वेतोबाला केळ्याच्या घडाचा नैवेद्य आणि भल्या मोठ्या चामड्याच्या चपलांच्या जोडांचा नवस बोलला जातो.
श्रीदेव वेतोबाचे देवालय इ.स. १६६० मध्ये बांधण्यात आले असून या देवालयाचा सभामंडप सुमारे इ.स. १८९२ ते १९०० च्या दरम्यान बांधला गेला. श्री देव वेतोबाच्या देवालयाचा नगारखाना ३ मजली तर देवालय दुमजली आहे. अनेक आख्यायिका आणि अनेक दैवी प्रसंगांची अनुभूती घेऊन ‘रक्षणकर्ता वेतोबा’ हि मालिका सुरु होत आहे. अद्याप मालिकेतील कलाकार आणि रिलीज डेट समोर आलेली नाही. मात्र टीझरमूळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Discussion about this post