हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक ८ मार्च.. त्यामुळे विविध ठिकाणी ‘जागतिक महिला दिन’ विविध पद्धतीने साजरा केला जात आहे. या दीनानिमित्त अनेक सेलिब्रिटी सोशल मीडिया हँडलवर आपल्या आयुष्यातील त्या प्रत्येक स्त्री साठी तसेच महिला चाहता वर्ग आणि नेटकरी परिवारासाठी शुभेच्छांच्या पोस्ट शेअर करत आहेत. प्रत्येकाची शुभेच्छा देण्याची पद्धत ही काहीशी वेगळी पण मनोवेधी आहे. आज ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनेदेखील महिला दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने कवयित्री संजीवनी बोकील यांची एक प्रेरणादायी कविता तिच्या अंदाजात म्हटली आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या माध्यमातून घराघरातील महिलांची मैत्रीण झालेली अरुंधती आज आपल्या मैत्रिणींसाठी एक कविता सादर करताना दिसली आहे. मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे तिने व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून महिला वर्गाला आजच्या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…! संजीवनी बोकील ह्यांची माझी अतिशय लाडकी कविता खास तुमच्यासाठी. कुणी नसलं तरी चालेल.. तुझी तू रहा..’
मधुराणीने सादर केलेल्या कवितेच्या पंक्ती खालीलप्रमाणे आहेत:-
कुणी नसलं तरी चालेल.. तुझी तू रहा।
फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा.. कुणी नसलं तरी चालेल..
हास जेव्हा ओठ हसतील.. रड जेव्हा डोळे रडतील,
हसण्यावर अश्रुंवर तुझी सत्ता ठेवून रहा.. कुणी नसलं तरी चालेल.. तुझी तू रहा।।
काटे जरी बोटी रुततील.. फुफाट्यात पाऊले जळतील,
फक्त तुला आवडलेलीच फुले वेचित रहा.. कुणी नसलं तरी चालेल.. तुझी तू रहा।।
मुसळधार सरी येतील.. तुझा अंगार विझवू पाहतील,
विझणाऱ्या ठिणगीवर फुंकर घालीत रहा.. कुणी नसलं तरी चालेल.. तुझी तू रहा।।
उसने मुकुट कोणी घालतील.. जरी अंगरखे पेहरून सजतील,
तुझ्या सुटी वस्त्राचा अभिमान तू वहा.. कुणी नसलं तरी चालेल.. तुझी तू रहा।।
मग कुठेतरी कमळे फुलतील.. सुगंध घेऊन वारे येतील,
तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर गात रहा.. कुणी नसलं तरी चालेल.. तुझी तू रहा।।
Discussion about this post