हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला आहे. सतीश यांना दिल्लीमध्ये प्रवासादरम्यान हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले आहे.
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरवर ट्विट शेअर करत हि दुःखद बातमी दिली आहे. सतीश कौशिक त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. आता त्यांचा मृतदेह मुंबईत आणला असून आजच त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
दिवंगत अभिनेता सतीश कौशिक यांच्या कुटुंबीयांनी एक पत्रक जाहीर केले आहे. या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, ‘आज दिनांक ९ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता सतीश यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडणार आहेत. वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव चाहत्यांकरता दर्शनासाठी आणण्यात येणारआहेत. तर संध्याकाळी ५ वाजता वर्सोवा येथीलच हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत’.
हिंदी सिनेसृष्टीमध्ये सतीश कौशिक यांनी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली असून जी पोकळी निर्माण झाली आहे ती न भरून निघणारी आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी पोस्ट शेअर करत शोक व्यक्त करत आहेत. सतीश कौशिक यांनी अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तर अनेक दिग्गजांसोबत त्यांनी विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही त्यांच्या पप्पू पेजर, कॅलेंडर यांसारख्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
Discussion about this post