हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टसाठी नेहमीच चर्चेत असतात. तुकोबांचे अभंग वापरून त्यातील योग्य अर्थ निवडक प्रसंगासाठी वापरणे हि त्यांची खासियत. अशीच एक नवी पोस्ट शेअर करत किरण माने यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. यात त्यांनी लिहिलंय कि, ‘बा तुकोबाराया… तुझ्या सावलीत यिल त्याला “न सरे ऐसे दान” देनारा तू… मग लेकराला कमी करनारंयस व्हय? तू मला भरभरून दिलंयस माऊली, आभाळभर दिलंयस. अभिनेता म्हनून माझ्यावर प्रेम करनार्या माझ्या चाहत्यांना मी तुझं विचारधन शेअर करतो. ते माझ्या पोस्टस् वाचून तुला अभ्यासायला सुरूवात करत्यात, तवा तर आनंद होतोच… पन माझ्यावर टीका करनारे, मला ट्रोल करतानाबी कवाकवा जाणूनबुजून तुझ्या अभंगाचा आधार घेत्यात, तवा त्यांचा राग न येता, हरखून काळीज सुपाएवढं होतं ! “निंदक तो परउपकारी.. काय वर्णूं त्याची थोरी !” असं म्हनावं वाटतं’.
‘…मागच्या एका वर्षात माझ्या भावविश्वात आणि करीयरमध्ये लै खतरनाक उलथापालथी झाल्या. लढलो जिगरा लावून, पन खरंतर आतनं जीव घाबराघुबरा झालावता… “तुका म्हणे माझे दचकले मन… वाटे वायांवीण श्रम गेला” अशी अवस्था व्हायची.. पन दूसर्या बाजूला मी तुझा हात घट्ट पकडला होता… हिंमत आन् ताकद एकवटून झुंजत होतो.. शत्रूची एकेक चाल उधळून लावत होतो. “तुका म्हणे तुझ्या नामाचिये बळे… अवघियांचे काळे केले तोंड बिगबाॅसमधी जायच्या महिनाभर आधी देहूला तुझ्या पायांवर डोकं ठेवायला आलोवतो. लै बेकार मनस्थिती होती. मनापास्नं, जीव लावून कामाचा आनंद घेत असतानाच, कटकारस्थानी लोकांनी माझ्यासमोरनं कॅमेरा हिरावून घेतल्याला सहा महिने उलटून गेलेवते. “जीवना वेगळी मासोळी.. तैसा तुका म्हणे तळमळी” अशी अवस्था झालीवती. गाथा बुडवल्यावर अन्नपानी सोडून तू ज्या शिळेवर बसलावतास, त्या शिळेकडं बघताना डोळं भरून आलं. अचानक मनात आलं, तू ज्या भयाण, ‘पर्वताएवढ्या’ वेदनेतनं गेलायस, त्यापुढं माझं दु:ख म्हन्जे ‘जवा’एवढं ! तिथनं उठलो आन् भिडलो जगन्याला’.
‘बर्याचजणांना मी संपलो असं वाटत असतानाच माझ्या आयुष्यानं अशी उसळी घेतली…अशी भरारी घेतली की वाटलं, “याचसाठी केला होता अट्टाहास !. पूर्वी फेसबुकवरनं तुझ्या अभंगांचं निरूपण करताना हजारो लोक ते वाचतात, समजुन घेतात, प्रेरणा घेतात याचं लै समाधान असायचं.
नंतर त्यापुढं एक पायरी वर जाऊन ‘बिगबाॅस’च्या घरातल्या कॅमेर्यातनं रोज लाख्खो, कोट्यावधी लोकांपर्यन्त तुझे अभंग पोचवताना छाती अभिमानानं भरून यायला लागली ! माऊली, आता माझं आयुष्य एका नव्याच वाटेवर आणून ठेवलंयस तू. खडबडीत, काट्याकुट्यांची वाट संपली. गाडी मेनरोडला लागलीय.. मेगा हायवे थोडा नजरेच्या टप्प्यात आलाय. तिथं पोचायलाबी कमी संघर्ष नाय, पन आता मी ढिला पडत नस्तोय. मनापास्नं, प्रामाणिकपणानं आणि महत्त्वाचं म्हन्जे ‘अभ्यासून’ काम करायचा तुझा सल्ला इसरनार नाय. जीवाचं रान करीन, रक्ताचं पानी करीन’.
Discussion about this post