हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची ड्रामा क्वीन अशी ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे बरीच चर्चेत आहे. राखी स्वतः सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे तिच्या आयुष्यातील लहानातली लहान गोष्ट नेटकऱ्यांपर्यंत पोहोचत असते. राखीने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून अनेक संकटे आणि वाईट परिस्थितून मार्ग काढले आहेत. मात्र प्रेमात वारंवार मात खाल्ल्यानंतर शेवटी राखीने तिच्या स्वाभिमानाचा लढा दिलाच आणि याच आपबितीवर तिने एक व्हिडीओ सॉंग तयार केले. जे आता रिलीज झाले असून चांगलेच व्हायरल होत आहे.
अभिनेत्री राखी सावंतचं हे नवीन गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे गाणं पाहून कुणीही सांगेल कि या गाण्यातील घटना म्हणजे राखीचा जीवनपटचं आहे. या ४ मिनिट २८ सेकंदाच्या गाण्यात राखीने तिच्या आयुष्यातील वेदनादायी घटनांचा क्रम लावला आहे. यात राखीचा बॉयफ्रेंड आदिलसोबतचे नाते, त्यांनतर लग्न, घटस्फोट, आईचं निधन अशा गोष्टींचा समावेश आहे. राखीने या गाण्यातून जणू आपलीच व्यथा मांडली आहे. या गाण्याचे नाव ‘झूठा’ असे आहे. या गाण्यात सुरुवातीला राखीला प्रसिद्ध हिरोईन दाखवण्यात आले आहे. त्यानंतर तिच्या आयुष्यात एक मुलगा येतो ज्याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये येते. पुढे तो तिला लग्नाची मागणी घालतो आणि त्यांचे लग्न होते.
यानंतर तिचा पती वेगळ्या मुलीसोबत वेळ घालवतो हे तिला समजताच ती त्याला जाब विचारते. तर तो राखीला मारहाण करतो. अशातच राखीच्या आईचे निधन होते आणि या दरम्यान ती आक्रोश करते. शेवटी ती स्वतःसाठी लढते आणि त्याला पोलिसांच्या हवाली करते. एकंदरच हे गाणे पाहून राखीने तिचा पती आदिल खान दुरानी याच्यावर निशाणा साधल्याचे स्पष्ट दिसत आहे. अदिलवर फसवणुकीचे आरोप लावत राखीने त्याच्याविरोधात FIR दाखल केल्यामूळे तो सध्या तुरुंगाची हवा खातोय. तर राखी नवं आयुष्य जगण्याच्या प्रयत्नात आहे.
अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, राखीचा भाऊ राकेश तिच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणार आहे. ज्याचे नाव ‘रावडी राखी’ असे असणार आहे. याचे दिग्दर्शन आणि निर्मिती राकेश करणार आहे. तसेच चित्रपटात राखीची भूमिका कोण साकारणार हे अजून समोर आलेले नाही.
Discussion about this post