हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता दिग्पाल लांजेकर हे इतिहासातील सुवर्ण पाने हळू हळू उलघडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्यगाथांचा हा जागर अविरत सुरूच आहे. आतापर्यंत शिवकालीन अष्टकातील चार पुष्प प्रदर्शित झाल्यांनतर आता पाचव्या पुष्पाची जोरदार चर्चा सुरु आहे.
स्वराज्यनिष्ठा व लढवय्येपणाच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. यावेळी त्यांना साथ लाभलेल्या सहकाऱ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढा दिला. याच शिलेदारांपैकी एक म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे. त्यांच्यावरील हे पाचवे चित्रपुष्प लवकरच आपल्या भेटीला येणार असून अलीकडेच त्याचा सळसळता टिझर आणि मोशन पोस्टर रिलीज झाले आहे.
मराठ्यांचा इतिहास हा धगधगता ज्वालामुखी आहे. हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधताना जीवाचं रान करणाऱ्या शिलेदारांपैकी एक म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णपान नरवीर तान्हाजी मालुसरे. तान्हाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची यशोगाथा मांडणारा ‘सुभेदार’ हा चित्रपट लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प आहे.
हा चित्रपट जून २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान शिवजयंतीच्या मुहूर्तावर पुण्यात ‘शिवभक्त प्रतिष्ठान’ आयोजित समारोहात १५ हजार शिवभक्तांच्या साक्षीने कलाकार तसेच तंत्रज्ञांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
‘सुभेदार’ या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांचे शौर्य आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत ज्या सिंहाने गड राखला त्याच्या अंगावर काटा आणणाऱ्या पराक्रमाची हि गाथा आहे. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘सुभेदार’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. तर प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायण वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, विनोद निशिद जावळकर, शिवभक्त अनिकेत निशिद जावळकर, श्रुती दौंड हे निर्माते आहेत.
Discussion about this post