हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता किरण माने हे विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. बिग बॉस मराठी सीजन ४ मध्ये जाऊन आल्यानंतर तर किरण माने रोज विविध ठिकाणी सत्कारासाठी जाताना दिसत आहेत. या शोमुळे किरण माने आता फक्त साताऱ्याचे राहिले नाहीत तर अख्ख्या महाराष्ट्राचे झाले आहेत. अशातच किरण माने यांना थेट अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा फोन आला आणि त्यांच्या एनव्हायरमेन्टल फोरमच्या माध्यमातून अभिनेत्याचा सत्कार करण्यात आला. स्वतः अजितदादांच्या पत्नीने फोन केल्यामुळे किरण माने भारावले होते आणि म्हणूनच हा अनुभव त्यांनी चाहत्यांसह शेअर केला आहे.
किरण मानेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘किरणजी, मी बारामतीहून सुनेत्रा पवार बोलतीये. यावर्षी आमच्या फोरमच्या वर्धापनदिनादिवशी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून यावं अशी आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे. फोरमचं काम मला माहित होतं. त्यामुळे एका क्षणात होकार दिला. …अजितदादांच्या पत्नी सुनेत्रावहिनींनी बारामतीमध्ये एनव्हायरमेन्टल फोरमच्या माध्यमातनं पर्यावरणविषयक जागृतीचं अफाट काम केलंय! एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटूंबियांनी पदाचा, अधिकारांचा, आर्थिक सबलतेचा, जनाधाराचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर समाजोपयोगी कामांसाठी कसा करावा, याचं उत्तम उदाहरण आहे हे. कार्यक्रमादिवशी संवाद साधताना वहिनींचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं यावरचा सखोल अभ्यास पाहुन मी अक्षरश: थक्क झालो! पर्यावरणशास्त्र, हवामानबदल, प्रदुषण, प्राणी-पक्षी याबद्दल सर्वांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये अवेअरनेस यावा यासाठी त्या अथक परीश्रम घेतात. हल्ली मोबाईल गेम्समध्ये अडकलेल्या लहान मुलांना खुल्या मैदानात आणून लगोरी, सूरपारंब्या, गोट्या, विटीदांडू अशा अनेक लुप्त होत चाललेल्या खेळांच्या स्पर्धाही भरवल्या जातात’.
पुढे लिहिलंय, ‘आजच्या बदललेल्या जीवनशैलीत खूप मोलाचं काम आहे हे. काल पर्यावरणप्रेमी अनुज खरे यांना ‘वसुंधरा पुरस्कार’ आणि विविध क्षेत्रात जगभर नांव कमावणार्या निवडक बारामतीकरांना ‘बारामती आयकाॅन’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. बारामती हे माझं जन्मगांव. कोर्हाळे बुद्रुक माझं आजोळ. माझ्यावर निरपेक्ष आणि अतोनात प्रेम करणारे, कुठल्याही संकटात माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारे माझे मामा तानाजीबापू, नंदूआबा, तात्या आणि कुटूंबीय… सन्मित्र नितिन यादव, महादेव बालुगडे, अमोल काटे, ॲड.अमर महाडिक.. असे अनेक ‘जिवातले गणगोत’ बारामतीनं मला दिले. अशा भूमीत, अशा समाजभान जपणार्या कार्यक्रमात, आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रीत करावं यासारखा दूसरा आनंद नाही. याप्रसंगी माझ्या माणसांच्या नजरेत दिसलेलं कौतुक आणि अभिमान, ही माझी यापुढच्या संघर्षातली शिदोरी आहे’.
Discussion about this post