हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीसाठी अत्यंत मोठा धक्का असणारी माहिती समोर आली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज अल्पशा आजराने निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान ते कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानी होते. आज ११.३० वाजता कुलकर्णी यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे. भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनानाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अभिनय क्षेत्रात अत्यंत मोठे आणि मोलाचे योगदान आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत विविध ढंगाच्या विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेली छोट्यातील छोटी भूमिका नेहमीच गाजली. झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई , सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा ३०० पेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.
त्यांच्या कारकिर्दीत १९८४ साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणं प्रचंड गाजलं. आजही या गाण्याच्या तालावर लोक थिरकतात. अभिनेते भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालकदेखील होते. आतापर्यंत कुलकर्णी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. चित्रपट महामंडळाने त्यांना ‘चित्रभूषण पुरस्कार’ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.
Discussion about this post