हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधील गौरी हि भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णीचा मोठा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. गौरी स्वतः सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग असून त्यांच्यासाठी गौरीच्या अपघाताची माहिती अत्यंत धक्कादायक ठरली आहे. सध्या गौरीवर उपचार सुरु असून तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.
अभिनेत्री गौरी कुलकर्णीचा नुकताच एक मोठा अपघात झाला असून हा अपघात गंभीर स्वरूपाचा होता. या अपघातात गौरीच्या दुचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच झालं असं कि, गौरीच्या स्कुटीला एका बाइकस्वाराने समोरून येऊन धडक दिली आणि यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात गौरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून पुढील तीन आठवडे तिला सक्तीचा आराम करण्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये गौरी कोणत्याही मालिकेत दिसणार नाही.
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील गौरी आणि यश ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. दरम्यान त्यांच्या नात्यात दुरावा आल्याने लग्नाचा निर्णय काही होईना. त्यांचे वाद मिटवत म्हणून नेहमीच प्रेक्षक प्रार्थना करताना दिसतात. अशातच आता गौरीचा अपघात झाल्याने पुढील ३ आठवडे ती प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकणार नाही.
या अपघाताबद्दल गौरीने एका माध्यमाला माहिती देताना सांगितलं कि, ‘एक बाइकस्वार उलट मार्गाने आला आणि माझ्या स्कुटीला धडक दिली. समोरून धडक दिल्याने माझी स्कुटी रस्त्यावर स्लीप झाली आणि माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली. माहितीनुसार, गौरीच्या पायाला फ्रॅक्चर असून ही घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. त्यामुळे सध्या गौरी तिच्या घरी आराम करत आहे.
Discussion about this post