हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. सोहळ्याची खास झलक दाखवणारे प्रोमो पाहून हा सोहळा खूपच दिमाखदार पद्धतीने होणार आहे यात काहीच वाद नाही. दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स, विविध पुरस्कार आणि नुसता जल्लोष. या पुरस्कार सोहळ्याबद्दल आणखी एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे ‘जीवनगौरव पुरस्कार’. … आणि यंदाचा हा जीवनगौरव पुरस्कार मराठी सिनेसृष्टीचे अभिनय सम्राट अभिनेते ‘अशोक सराफ’ म्हणजेच अशोक मामांना प्रदान करण्यात येणार आहे. ‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२३’ हा सोहळा रविवार २६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
अभिनेते अशोक सराफ यांनी मराठी सिनेसृष्टी अगदी गाजवली आहे. आपल्या बाहरदार अभिनयाने आणि आपल्या अस्खलित विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घातली आहे. या महान नटसम्राटाला मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने आपल्या नृत्याविष्काराने एक अनोखी मानवंदना या पुरस्कार सोहळ्यात दिली आहे. अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडणारा हा परफॉर्मन्स आपल्याला सोहळ्यात पाहता येणार आहे. अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ‘अशोक मामा’ हि नुसती ओळख नाही तर हे एक नातं आहे जे प्रत्येकासोबत जोडलं गेलं आहे.
पन्नासहून अधिक हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, साधारण पंधरा टीव्ही मालिका, त्यात पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक पूर्ण केलेल्या या नटसम्राटाबद्दल बोलावे तितके कमीच. एवढा प्रचंड ताकदीचा प्रवास करणाऱ्या अशोक मामांनी केवळ सिने इंडस्ट्री गाजवली नाही तर घडवली आहे. ‘अभिनय शिकायला कुठल्या शाळेत जायची गरज नाही. अशोक सराफ नावाचं विद्यापीठ आहे केवळ बघत राहिलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे. अशोक मामा, आमच्या आयुष्यातले अनेक क्षण सुंदर केलेत तुम्ही. अशाच आणखी अजरामर भूमिका करण्यासाठी तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना आणि एवढं प्रचंड यश मिळवूनही तुमच्यासारखं साधं सरळ राहण्याची शक्ती आम्हाला मिळो. तुमच्या अभिनयाला आणि सच्चेपणाला झी मराठी परिवारातर्फे मानाचा मुजरा!’ अशा शब्दात झी मराठीने अशोक मामांना अनोखी आणि भावनिक मानवंदना दिली आहे.
Discussion about this post