हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर सर्वत्र नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचे शीर्षक जितके हटके कथाही तितकीच हटके असणार यात काही वाद नाही. चित्रपट नेमकं काय बोलू पाहतोय..? यावर केवळ चर्चा सुरु आहे. ठोस असं काही सांगता येणार नाही. पण तरीही कल्पनेचे घोडे दौडले तर शीर्षकातच दडली आहे चित्रपटाची कथा हे समजणे काही अवघड नाही.
हा चित्रपट मुळातच चौकटीबाहेर विचार करायला लावणार आहे. कारण या चित्रपटात रील नव्हे तर रिअल लाईफ पोलीस खरीखुरी भूमिका साकारताना दिसणार आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे डाकूच्या, दिग्दर्शक नागराज मंजुळे पोलिसाच्या तर अभिनेता आकाश ठोसर स्वयंपाक्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिघांनी आपापल्या प्रतिमेपेक्षा वेगळ्या भूमिका यात साकारल्या आहेत. यातील सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे यांच्या भूमिकेविषयी अधिक बोलले जात आहे. पहिल्यांदाच नागराज मंजुळे थेट मुख्य भूमिकेत आणि ते देखील ‘ॲक्शन हिरो’च्या अंदाजात दिसत आहेत. मात्र विशेष सांगायचे झाले तर, या चित्रपटात नागराज मंजुळे यांचे जे सहकारी पोलीस अधिकारी आहेत ते काही कलाकार नाहीत. तर हे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलीसच आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून रिअल पोलीस रिलमध्ये दिसणार आहेत.
अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा प्रत्येक चित्रपट काहीतरी हटके कथानक घेऊन येतो. समाजाच्या गर्भात दडलेल्या एखाद्या विषयावर खुले भाष्य करतो. याहीवेळी त्यांच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात प्रेमकथा आहे. पण त्याचसोबत फुल्ल ऍक्शनसुद्धा आहे. या चित्रपटातदेखील त्यांनी नवोदितांना संधी दिली आहे. कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गावकऱ्यांना प्राधान्य देणे ही मंजुळे यांची खासियतच. यामुळे चित्रपटाच्या कथानकाला वास्तवाचा स्पर्श होतो असे ते म्हणतात . हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’मध्ये पोलीस आणि डाकूंची चकमक दिसत आहे. यामध्ये हुबेहूब डाकू साकारायला महाराष्ट्रातील विविध भागांतील कलाकार आणि त्याच तोडीचे पोलीस म्हणून खऱ्याखुऱ्या पोलिसांना यामध्ये अभिनयाची संधी दिली आहे.
Discussion about this post