हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ची चर्चा सुरु आहे. हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना रविवार २६ मार्च संध्या. ७ वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे. या सोहळ्यात दरवर्षी सिनेसृष्टीतील एका दिग्गज कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार दिला जातो आणि यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी गेली अनेक दशकं सिनेसृष्टी आपल्या निखळ अभिनयाने गाजवली आहे. त्यामुळे हा पुरस्कार अशोक मामांसाठी.. अशोक सराफ यांना हा पुरस्कार त्यांच्याबरोबर काम केलेल्या अभिनेत्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कला क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यात पाणी तरळले. दरम्यान सुबोध भावेने अशोक मामांबद्दल वाटणाऱ्या भावनांना वाट मोकळी केली आणि सगळेच भावुक झाले.
सुबोध भावे म्हणाला कि, ‘एका माणसामुळे संपूर्ण इंडस्ट्री ओळखली जाते.. मराठी इंडस्ट्री म्हणजे अशोक मामा ज्याच्यात काम करतात ती इंडस्ट्री. त्यांच्या अभिनयावर त्यांच्या कामावर आमची अख्खी पिढी पोसली गेली. त्यांना बघत बघत आम्ही काम करत आलो, त्यांना बघत बघत आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेत आलो. आताच्या आमच्या सतत सगळं ओरबाडून घेण्याच्या काळात तुझ्यासारखा कलाकारांच्या संस्कृतीला, तत्त्वांना घट्ट धरून काम करणाऱ्या आणि आम्हा सगळ्यांवर तितकीच मायेची ऊब धरणाऱ्या आम्हा सर्वांवर प्रेम करणाऱ्या तुला आम्हा सर्वांकडून हा मानाचा मुजरा’. यावेळी सुबोध भावेने अक्षरशः वाकून मामांना मुजरा केला.
इतकं प्रेम आणि कलाकारांच्या मनात त्यांच्याप्रती असलेल्या भावना जाणून घेताना अशोक मामा प्रचंड भावूक झाले. या प्रसंगी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते आणि त्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंनी जागा घेतली होती. हा क्षण अतिशय भावनिक करणारा आणि कुठेतरी मनाला सुखावणारा होता. ज्या माणसाने कलाकारांच्या पिढ्या घडवल्या आणि मराठी चित्रपट सृष्टीला मानाचे स्थान मिळवून दिले त्या अशोक मामांचा असा गौरव होणे हि खरंच फार मोठी बाब आहे. खरंतर अशोक मामांप्रती असलेलं प्रेम, आदर जितका व्यक्त करता येईन तितके कमी असले तरीही कलाकाराचं कलाकाराला कलेसाठी मुजरा करणं हि खरोखर कंठ दाटवणारी गोष्ट आहे.
Discussion about this post