हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने जगतातील दिग्गज अभिनेते मोहन आगाशे हे मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत आजवर त्यांनी मनोरंजनाच्या विविध माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आजतागायत त्यांना त्यांच्या कारकीर्दीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे आणि यातच आता आणखी एका मानाच्या पुरस्काराचा समावेश होतोय. यंदाचा ‘पुण्यभूषण 2023’ हा पुरस्कार अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराला भारतातच नव्हे तर भारताबाहेरही प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.
पुण्यभूषण फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा ‘पुण्यभुषण पुरस्कार’ हा मराठी, हिंदी, नाट्य, चित्रपट अशा मनोरंजन क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी डॉ. मोहन आगाशे यांना देण्यात येणार आहे. येत्या जुलै महिन्यात हा दिमाखदार सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यंदाचा हा पुरस्कार सोहळा ३४’व्या वर्षात पदार्पण करतोय. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह आणि रुपये १ लाख रोख असे आहे. यंदा डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील या पुरस्काराने गौरवण्याचा घेतल्याची माहिती अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी दिली आहे.
या पुरस्काराचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे, सोन्याच्या फळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बाल शिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदेवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह या पुरस्काराचे असते. यंदा मनोरंजन विश्वातून डॉ. मोहन आगाशे यांचा सन्मान होण्याबरोबरच सीमेवर कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या ५ जवानांचादेखील मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सेलर राधाकृष्णन, हवालदार पंजाब एन. वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक निर्मलकुमार छेत्री यांचा समावेश आहे.
Discussion about this post