हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम म्हणजे काय..? तर प्रेम म्हणजे दोन जीवांचे मिलन. जणू स्वर्गात बांधल्या गेलेल्या रेशीमगाठीच. पण क्षणात त्यांच्या आयुष्यात कुणी तिसरा आला तर..? अशी अकल्पित प्रेमकथा असलेला आगामी मराठी चित्रपट ‘सरी’ हा येत्या ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटामधील प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारांचे नवेकोरे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.
या पोस्टरमध्ये मालिकेतून घराघरात पोहोचलेला अजिंक्य राऊत, विविध चित्रपटांतून तरूणांच्या हृदयाचा ठाव घेणारी रितिका श्रोत्री आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वी अंबर यांच्या प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे.
हे पोस्टर पाहिल्यावर आता यांचे प्रेम त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार…? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ‘लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइज अँड मिऱ्याकल्स’ अर्थात ‘जीवन हे आश्चर्य आणि चमत्कारांनी भरलेले आहे’ अशी या चित्रपटाच्या शीर्षकाची टॅगलाईन आहे.
कॅनरस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन अशोका के. एस. यांनी केले असून संवाद आणि सह दिग्दर्शन विशाल पाटील यांनी केले आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर ‘सरी’च्या निमित्ताने प्रथमच मराठीत पदार्पण करत आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे. प्रेमकथा असलेल्या ‘सरी’ या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणाले कि, ‘गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाने घेतलेली भरारी मी पाहिली आहे. मी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत असलो, तरी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. त्यामुळेच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची इच्छा होती. ती संधी मला ‘सरी’ या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. प्रेक्षकांना ही प्रेमकथा नक्कीच भावेल’.
Discussion about this post