हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र दिग्दर्शक केदार शिंदेंच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट लोकशाहीर स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. येत्या २८ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट अवघ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. याच बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या निमित्ताने केदार शिंदेंच्या अत्यंत गाजलेल्या मालिकेची म्हणजेच श्रीयुत गंगाधर टिपरेची टीम एकत्र आली होती. या भेटीचा एक फोटो केदार शिंदेनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचा टिझर राज ठाकरेंच्या हस्ते अलीकडेच लाँच झाला. या निमित्ताने श्रीयुत गंगाधर टिपरे या लोकप्रिय आणि अत्यंत गाजलेल्या मालिकेची टीम एकत्र आली होती. यावेळी मालिकेतील आबा म्हणजेच दिलीप प्रभावळकर, श्यामल म्हणजेच शुभांगी गोखले, शेखर म्हणजेच राजन भिसे असे सर्व कलाकार एकत्र आले होते. मुख्य म्हणजे बऱ्याच काळापासून मनोरंजन विश्वापासून दूर असलेली अभिनेत्री रेश्मा नाईक जिने या मालिकेत शलाकाची भूमिका साकारली होती तीदेखील यावेळी उपस्थित होती. पण यावेळी मालिकेतला शिऱ्या म्हणजेच अभिनेता विकास कदम अनुपस्थित होता. पण प्रेक्षकांच्या मात्र तो पक्का आठवणीत आहे.
फोटोत शिऱ्या नाही हे बघताच नेटकऱ्यांनी शिऱ्या कुठेय..? असं म्हणत विकासची आठवण काढली. यावेळी सर्व कलाकार मंडळी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी खूप गप्पा मारल्या. आठवणी ताज्या केल्या आणि झकास फोटोसुद्धा काढला. हाच फोटो केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘ओल्ड इज गोल्ड’ (जुनं ते सोनं). मालिकेनंतर तब्बल २२ वर्षांनी श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतील हे सर्व कलाकार मंडळी एकत्र असल्याचे पाहून नेटकऱ्यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे.
Discussion about this post