हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वात चित्रपट, वेब सिरीज यांना जितकं महत्त्व आहे तितकच महत्व रंगभूमीला देखील आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींचा एक वेगळा असा मोठा वर्ग आहे. अनेक लोक चित्रपट थेटरमध्ये जाऊन पाहण्यापेक्षा नाटक थेटरमध्ये जाऊन पाहतात आणि आनंद लुटतात. यामुळे आजही अशी अनेक नाटकं आहेत ज्यांना प्रेक्षकांची तुफान गर्दी झाल्याचे पहायला मिळते. यापैकी एक नाटक म्हणजे ‘दादा एक गुड न्यूज आहे’. पण या नाटकाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी अशी की, ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचे आगामी प्रयोग रद्द करण्यात आले आहे. यामागचे कारण असे की नाटकातील मुख्य अभिनेता उमेश कामत याची तब्येत अचानक बिघडली आहे. याची माहिती त्याची पत्नी अभिनेत्री प्रिया बापटने दिली आहे.
अभिनेता उमेश कामतची पत्नी आणि मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये एक व्हिडीओ आहे आणि यात ती उमेशसोबत दिसतेय. यात ती म्हणतेय कि, ‘गेल्या काही दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे उमेशचा आवाज पूर्णपणे बसला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला काहीही बोलण्यास सक्त मनाई केली आहे. अचानक उद्भवलेल्या या कारणाने आम्हाला उद्या आणि परवाचे ‘दादा एक गुडन्यूज आहे’ या नाटकाचे प्रयोग रद्द करावे लागत आहेत. आम्ही दोघंही त्याबद्दल तुमची माफी मागतो’.
पुढे म्हणतेय, ‘ज्यांनी या नाटकासाठी आगाऊ बुकींग केलं आहे, त्यांचे पैसे रिफंड केले जातील. यानंतर येणाऱ्या आठवड्यातील विकेंडचे प्रयोग मात्र नक्कीच होतील. कारण हा आठवडा उमेश आराम करेल आणि पुढच्या आठवड्यात तो नक्कीच बरा होईल. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तुमची माफी मागतो आणि मला विश्वास आहे की तु्म्ही सर्वजण हे समजून घ्याल’. प्रियाच्या पोस्टनंतर चाहते उमेशला स्वतःची काळजी घेऊ आणि लवकर बरा हो असे म्हणताना दिसत आहेत. सोनल प्रॉडक्शन निर्मित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘दादा एक गुडन्यूज आहे’ हे नाटक तुफान गाजतंय. यामध्ये बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन होते. नाटकाचे लेखन कल्याणी पाठारे यांनी केले आहे. तर या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आरती मोरे, ऋषी मनोहर अशी तगडी स्टारकास्ट आहे. या नाटकाच्या माध्यमातून प्रियाने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलंय.
Discussion about this post