हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाचा सिंघम अभिनेता अजय देवगण गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी सिनेमा ‘भोला’मूळे प्रचंड चर्चेत आहे. हा सिनेमा ३० मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. या सिनेमातील अजय देवगणचा अत्यंत लक्षवेधी ठरला. शिवाय चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरने चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचवली. आता प्रतीक्षा केवळ प्रदर्शनाची आहे. असे असताना अजय देवगणच्या ‘मैदान’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकतंच आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर अभिनेता अजय देवगणने त्याचा आगामी सिनेमा ‘मैदान’चं पोस्टर शेअर केलं आहे, या पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘एक माणूस, एक विश्वास, एक स्फूर्ती… सत्य घटनेवर आधारित ‘मैदान’मध्ये उतरणार संपूर्ण भारत’. अजय देवगणच्या या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून चांगलेच चर्चेत आले आहे. माहितीनुसार, हा चित्रपट भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक राहिलेल्या सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित आहे. तसेच सिनेमात दाखवलेले प्रसंग हे वास्तविक आयुष्यात घडलेल्या प्रसंगांवरून प्रेरित आहेत. अभिनेता अजय देवगण हा सय्यद अब्दुल रहीम यांचीच भूमिका ‘मैदान’मध्ये साकारताना दिसणार आहे.
सय्यद अब्दुल रहीम यांना भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाची सुरुवात करण्याचे श्रेय दिले जाते. कॅन्सरशी झुंज देत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवले आणि म्हणून फुटबॉल विश्वात त्यांना खूप आदर आहे. सय्यद अब्दुल रहीम हे १९५० ते १९६३ सालापर्यंत भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. सय्यद अब्दुल रहीम हे मूळ हैद्राबादचे.
हैदराबाद शहर पोलिसांचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे १९५० मध्ये ते भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक झाले. तेव्हा भारतीय खेळाडू हे अनवाणी पायाने फुटबॉल खेळत असे. पण रहीम यांनी सूत्र हातात घेताच भारतीय संघाला शूज घालून फुटबॉल खेळायला शिकवले आणि जगातील बलाढ्य संघांमध्ये एक महत्वाचे स्थान मिळवून दिले. अशा या व्यक्तिमत्वावर आधारित ‘मैदान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा करत आहेत. तसेच बोनी कपूर या चित्रपटाचे निर्माते आहेत.
Discussion about this post