हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या आगामी मराठी चित्रपट ‘सर्किट’मधील टोटल अॅक्शनपॅक्ड ‘वाजवायची सानकन’ हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. हे गाणं सुपर भन्नाट रॅप शैलीतल असल्यामुळे तरुणाईचं लक्ष वेधून घेत आहे. मुख्य म्हणजे हे गाणं मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी आपल्या हटके अंदाजात गायलं आहे. तर गाण्याचे तगडे बोल हे मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. ‘सर्किट’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिल २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी, मिलिंद शिंदे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
‘सर्किट’ या चित्रपटात पटकन संतापणाऱ्या तरुणाची गोष्ट मांडण्यात आली आहे. त्यामुऴे या भूमिकेला साजेसं असं ‘वाजवायची सानकन’ हे गाणं लक्षवेधी ठरत आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन केलेल्या आणि बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजातील ‘काहीसा बावरतो, काहीसा सावरतो’ या रोमँटिक गाण्याला आधीच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. त्यामुळे आता रफटफ आणि अॅक्शनपॅक्ड असं ‘वाजवायची सणकन’ हे गाणंही प्रेक्षकांची दाद मिळवण्यात यशस्वी होणार यात काही शंकाच नाही.
भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत ‘सर्किट’ या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, किर्ती पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर अभिजीत कवठाळकर यांचं संगीत या चित्रपटातील गाण्यांना लाभलंय. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन केलं आहे. तर शब्बीर नाईक यांनी छायांकन आणि अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
Discussion about this post