हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अश्विनी महांगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अश्विनी केवळ एक अभिनेत्री नव्हे तर एक समाजसेविका आणि शेतकऱ्याची लेक आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याच शिकवणीचा वारसा पुढे चालवणारी हि अभिनेत्री नुकतीच शेतात काम करताना दिसली. अश्विनी तिच्या शेतकरी वडिलांचा शर्ट परिधान करत काळ्या मातीत घाम गाळताना दिसली. तिला असं कष्ट करताना पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. शिवाय अश्विनीने या व्हिडिओसोबत शेअर केलेलं कॅप्शन अतिशय वास्तवदर्शी आहे.
अश्विनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ज्वारी काढण्याचं काम सुरू आहे आणि तिथे ती ज्वारीची कणसं मशिनमध्ये टाकून नंतर पोत्यात भरण्यास मदत करतेय. या व्हिडिओसोबत अश्विनीने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘रात दिस मेहनत करी, खाई कष्टाची भाकरी, पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी. जगाचा पोशिंदा : बळीराजा… कोणताच राजकारणी किंवा सिस्टम शेतकर्याला जगवत नसते तर शेतकरीच या सर्वांना जगवत असतो आणि हेच ऊन, वारा, पावसासारखे शाश्वत सत्य आहे. ईडा पिडा टळूदे आणि बळीचे राज्य येऊदे. मी घातलेला शर्ट माझ्या वडीलांचा (नानांचा) आहे. नानांची मायेची ऊब, आम्हा सगळ्यांचे उन, वारा, पाऊस, आलेली संकटं यापासून कायम रक्षण केले त्याची जाणीव मनात कायम आहे’.
अश्विनीच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करीत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर अश्विनीचे कौतुक कात तिला आदर्श देखील म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे कि, ‘हे असतात शेतकऱ्याची पोरं/पोरी.. किती ही मोठे झाले तरी मातीशी नाळ कायम’. आणखी एकाने लिहिलंय, ‘आदर्श आहात ताई तुम्ही… त्या सर्वांसाठी, जे थोडीशी हवा लागताच आपली माती, आपली संस्कृती विसरतात… शेतकरी राजाला त्याचा हक्काचा मान, प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी तुमच्यासारखे लोक पाहिजेत’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘आपल्या वाडवडीलांचे संस्कार अभिमानाने अंगाखांद्यावर मिरवणारे आदर्श समोर असणे आवश्यक आहे’. अन्य एकाने लिहिलंय, ‘ताई आजपर्यंत मी तुझ्या सारखी सेलिब्रिटी नाही पाहिली.. तुझं सगळ्यांना समजून घेणं, आपलंस करून घेणं आणि जराही इगो न दाखवता सगळ्यांशी प्रेमाने वागणं मन जिंकून जातं’.
Discussion about this post