हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजक कथा, खुसखुशीत संवाद आणि उत्तम स्टारकास्ट असलेला आगामी मराठी चित्रपट ‘ऊर्मी’ येत्या १४ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तत्पूर्वी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रेमाचे नाते हे विश्वासावर टिकून असते पण त्याच विश्वासाचा जर घात झाला तर…?? अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट वैवाहिक आयुष्यातील सच्चेपणावर भाष्य करणारा आहे. नात्यातला गोडवा हळूहळू कटुतेकडे कसा वळतो आणि आज होत ते उद्या धुरकट होऊ लागत तेव्हा आयुष्यात येणाऱ्या वादळांवर आधारित हा चित्रपट एक अत्यंत उत्तम कथानक घेऊन येत आहे.
समृद्धी क्रिएशननं ‘उर्मी’ चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. डॉ. प्रवीण चौधरी चित्रपटाचे निर्माता, चैताली प्रवीण चौधरी सहनिर्माती आहेत. राजेश जाधव यांनी चित्रपटाचं पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. विजय गटलेवार आणि उत्पल चोधरी यांनी संगीत, अनंत कामत यांनी संकलन, कौशल गोस्वामी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी निभावलीय. चित्रपटात अभिनेत्री रसिका सुनील, सायली संजीव अभिनेता चिन्मय उदगीरकर, नितीश चव्हाण, माधव अभ्यंकर, सायली पराडकर,तृप्ती देवरे , संतोष शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट असून ऋतुजा जुन्नरकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.
“उर्मी” या चित्रपटात नाती, प्रामाणिकपणा, विश्वास, प्रेम, मैत्री हे बिंदू जोडत एक उत्तम कथा साकारली आहे. पती-पत्नी यांच्या नात्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे काय घडते ? असं चित्रपटाचं कथासूत्र आहे. नायकाचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू असताना आधीची प्रेयसी नायकाच्या आयुष्यात बाळासह परतते आणि तिचा दावा असतो की जन्माला आलेलं बाळ नायकाचंच आहे. आता नायकाच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्यापासून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला १४ एप्रिलला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा लागेल.
Discussion about this post