हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यापासून मोठी झेप घेत आता रुपेरी पडदा गाजवण्यास सुरुवात केली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीमध्ये ठसठशीत छाप उठवली आहे. सध्या ती तिच्या ‘गुमराह’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण काही दिवसांपूर्वी तिने एक रडतांनाचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये तिला नक्की काय झालंय..? याबाबत चर्चा सुरु झाली. या फोटोमध्ये मृणालचे सुजलेले डोळे पाहून ती खूप रडली असावी असे वाटत आहे आणि त्यामुळे तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. या फोटोबाबत तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूरने शेअर केलेल्या या इंस्टाग्राम स्टोरीतील फोटोवर तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘कालचा दिवस कठीण होता, पण आज मी अधिक मजबूत, समजदार आणि आनंदी आहे. प्रत्येकाच्या कथांची अनेक पाने आहेत, परंतु प्रत्येकजण ती मोठ्याने वाचत नाही. मला माझ्या कथांची पाने मोठ्याने वाचायची आहेत, कारण कदाचित मी त्याद्वारे जे शिकले ते कोणीतरी शिकले पाहिजे’. मृणालची हि पोस्ट सोशल मीडियावर भयंकर व्हायरल झाली. तिचा हा रडलेला चेहरा पाहून ती डिप्रेशनची शिकार झाली आहे.. तिचे ब्रेकअप झाले आहे… अशा अनेक चर्चांना उधाण आले. तसेच चाहत्यांची वाढती चिंता पाहून शेवटी मृणालने स्वत:चं तिच्या या फोटोबद्दल माहिती दिली.
या फोटोबाबत बोलताना एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मृणाल ठाकूर म्हणाली की, ‘एखाद्या व्यक्तीने असुरक्षित होण्याची भीती बाळगू नका. कमीपणा वाटणे आणि मदत मागणे यात एक बारिक रेषा आहे. कधीकधी तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतात. तुम्हाला कोणाकडून तरी प्रोत्साहन मिळावं असं वाटत असतं आणि ती पोस्ट शेअर केल्यानंतर मला खूप बरं वाटलं. अनेक लोकांनी स्वतःमधली कमतरता दाखवणं बंद केलंय. असे दिवस असतात जेव्हा आपण दुःखी होतो, आपल्याला आत्मविश्वास कमी वाटतो. परंतु याचा अर्थ असा नाही की नैराश्यसारखा मोठा शब्द वापरावा लागेल. कमीपणा वाटणं आणि मदत मागणं यात असणारी ती एक बारिक रेषा फक्त स्वीकारा.’
Discussion about this post