हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजचा दिवस हा तृतीयपंथी वर्गासाठी अत्यंत महत्वाचा आणि खास दिवस आहे. कारण आज वर्ल्ड ट्रान्सजेंडर व्हिजिबीलिटी दिवस आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. काही वर्षांपूर्वी ‘विक्स’ कंपनीच्या जाहिरातीतून लोकांना गौरी सावंत माहित झाल्या. या जाहिरातीतून गौरी यांनी आपल्या आयुष्याचा संघर्ष जगासमोर आणला आणि स्वतःची ओळख निर्माण केली. यानंतर येत्या काळात ‘ताली’ या वेबसिरीजच्या माध्यमातून त्यांची जीवनगाथा आपल्या समोर येणार आहे. ज्यामध्ये सुश्मिताने गौरी यांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे तिने शेअर केलेल्या व्हिडिओत गौरी सावंत यांच्या साथीने तिने चाहत्यांना एक संदेश दिला आहे.
या व्हिडिओ मध्ये सर्वात आधी श्री गौरी म्हणतात कि, ‘का वाजते टाळी..? बस काही पैसे मागण्यासाठी..? तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी..? स्वतःचा राग व्यक्त करण्यासाठी…. कि घुसमट लपवण्यासाठी..? काय यासाठी वाजते टाळी..?’ तर यावर सुश्मिता सेन म्हणते कि, ‘नाही .. आता टाळी वाजणार धैर्य वाढवण्यासाठी… एक नवी ओळख निर्माण करण्यासाठी.. या टाळीच्या नादस्वराने आभाळ हलवण्यासाठी.. फक्त हात नाही तर हृदयासोबत हृदय जोडण्यासाठी..’. सुश्मिताने हा शेअर केलेला व्हिडीओ आणि त्यासोबत लिहिलेलं कॅप्शन दोन्हीही चर्चेत आले आहे.
या व्हिडिओसोबत सुश्मिताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आता टाळी वाजणार हिंमत वाढवण्यासाठी!! तर चला आज ‘आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिवस’निमित्त सर्वांसाठी अधिक समावेशक आणि समान जग तयार करण्यासाठी हात जोडून टाळी वाजवूया!! प्रेम, शक्ती आणि एकतेच्या शक्तिशाली प्रवासासाठी!! मानवतेच्या दयाळू समुदायासाठी!!!’ सुश्मिताच्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रेरणादायी कमेंट्स केल्या आहेत. तृतीयपंथीयांना देखील आजच्या समाजात एक वेगळं आणि हक्काचं अस्तित्व आहे हे नमूद करणारी ‘ताली’ हि वेबसिरीज प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिग्दर्शित केली आहे.
Discussion about this post