हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात आजकाल नवनवीन कलाकार आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा योग्य वापर करून नवनवीन प्रयोग करत आहेत. हे प्रयोग पाहताना आणि अनुभवताना प्रेक्षकांनाही एक वेगळा आनंद अनुभवता येत आहे. आजकाल चित्रपट रिलीज होण्याआधी त्याची गाणीच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात. असंच एक काळजात घर करून बसणारं प्रेमगीत ‘टीडीएम’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘मन झालं मल्हारी’ असं या गाण्याचं शीर्षक आहे. यातील तरुण आणि तरुणीच्या नात्यातील प्रेमाचा गंध आता सोशल मीडियावर दरवळू लागला आहे. गाण्याचे बोल, संगीत आणि साधेपणा प्रेक्षकांना भावताना दिसतो आहे.
या गाण्यात नायक आणि नायिकेची रोमँटिक केमिस्ट्री, प्रेमात गुंतलेल्या त्यांच्या भावना आणि नात्यातील ओढ याचे अतिशय सुंदर वर्णन करण्यात आले आहे. प्रेयसी आणि प्रियकराच एकमेकांवर असलेलं प्रेम या गाण्याच्या शब्दातून अचूक हेरलं आहे. या शब्दांमध्ये इतका गोडवा आहे कि तो कधी मनात उतरतोय तेच कळत नाही.
‘टीडीएम’ चित्रपटातील ‘एक फुल’ हे गाणं आधीच ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यात आता ‘मन झालं मल्हारी’ गाण्याची भर पडली आहे. या गाण्याला संगीताची धार संगीतकार वैभव शिरोळे यांनी दिली आहे. तर गाण्याच्या ओळी कुणाल गायकवाड आणि वैभव शिरोळे यांनी रचल्या आहेत. शिवाय या गाण्याला प्रसिद्ध पार्श्वगायिका आनंदी जोशी आणि वैभव शिरोळे यांच्या सुमधुर आवाजाची साथ लाभली आहे.
‘टीडीएम’ या चित्रपटात अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी अशा नव्या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हे कलाकार नवखे असले तरीही त्यांच्या अभिनयतली चुणूक, निरागसता आणि भूमिकेची समज हि मुरलेल्या कलाकारासारखी आहे.
‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘ स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी केले आहे. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ सारख्या चित्रपटांनंतर आता हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस ते घेऊन येत आहेत. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post